'व्यक्तिरेखा तयार करण्याचे कसब' : गीता गोडबोले

geeta2_0.JPG
पूर्वी चित्रपटांमध्ये काम करणार्‍या कलाकारांसाठी त्यांचा रंगभूषाकार (मेकअप आर्टिस्ट) आणि वेशभूषाकार ठरलेला असायचा. त्यामुळे कदाचित त्या कलाकाराचा मेकअप सगळया चित्रपटांमध्ये फारसा वेगळा नसायचा. आज मात्र अशी परिस्थिती राहिलेली नाही. केवळ चित्रपटातल्या मुख्य भूमिका करणार्‍या कलाकारांचा मेकअप नाही तर त्या चित्रपटातल्या व्यक्तिरेखेनुसार अभ्यास करून त्या कलाकाराची रंगभूषा आणि वेशभूषा ठरवली जाते. व्यक्तिरेखांना पडद्यावर जिंवत करणार्‍या रंगभूषाकारांपैकी एक महत्त्वाचं नाव म्हणजे गीता गोडबोले....
नुकताच प्रदर्शित झालेला 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' चित्रपट ऑस्करपर्यंत जाऊन आला. चित्रपट यशस्वी तर झालाच शिवाय आंतरराष्ट्रीय पातळीवर तो तितकाच यशस्वी ठरला. या चित्रपटातील कलाकारांच्या व्यक्तिरेखा अस्सल जातीवंत करण्यासाठी गीता यांचा मोलाचा वाटा होता. केवळ हेच नाही तर निर्मात्याची भूमिका देखील त्या चोख बजावत असतात. 'पडद्यामागचे आम्ही' या सदरात आपण नेहमीच अशा पडद्यामागच्या कलाकारांना प्रकाशात आणण्याचं काम करतो. त्याच सदरातली आणखी एक महत्वाची कडी म्हणजे गीता गोडबोले यांची मुलाखत 'मम'च्या वाचकांसाठी....

* अलीकडेच प्रदर्शित झालेल्या आणि यशस्वी झालेल्या 'हरिश्चंद्राची फॅक्टरी'चा अनुभव कसा होता ?

- ऩक्कीच हा अनुभव माझ्यासाठी खूप विशेष होता. काम करताना खूप आनंद मिळाला. एकतर ही पिरियेड फिल्म होती. आजच्या काळामध्ये असे चित्रपट अर्थात मराठीमध्ये कमी तयार होतात. दादासाहेब फाळके ही व्यक्तिरेखा चांगल्या रितीने उभी राहावी यासाठी त्यांचे काही क्लिपिंग्ज आणि फोटो मी पाहिले. मात्र या चित्रपटाचं कॅरेक्टर डिझाईन मी करायच असं ठरलं नव्हतं. खूप उशीरा या प्रकियेत मी सहभागी झाले.
तुम्हाला विश्वास बसणार नाही, फक्त चार दिवस आधी मी या कामाची सूत्रे हातात घेतली. चित्रपटाचे दिग्दर्शक परेश मोकाशीने मला चित्रपटासाठी काम करण्याबाबत विचारलं. अशा परिस्थितीत काम करणं माझ्यासाठी आव्हान होतं. एका दिवसात मी नंदू माधव यांच्यासाठी विग तयार केला. त्यानंतर तालमी केल्या. चित्रपटाचं कॅरेक्टरायझेशन केलं. एकंदर या चित्रपटाचा अनुभव खूप चांगला होता.

* या चित्रपटाचा प्रतिसाद कसा होता?

- माझ्या वैयक्तिक यशापेक्षा कुठल्याही चित्रपटासाठी सांघिक कामगिरी महत्वाची असते. जेव्हा चित्रपट यशस्वी होतो तेव्हा सर्वांचे प्रयत्न त्यासाठी महत्वाचे असतात. कुठल्यातरी एका कामाची म्हणजे फक्त रंगभूषा किंवा वेशभूषेची प्रंशसा होते तेव्हा कुठलीतरी बाजू कमी आहे असे मी मानते. आमच्या चित्रपटाचं यश सगळयांच आहे.

geeta1.JPG

* केवळ हेच नाही तर निर्माता म्हणूनही तुम्ही काम करता, त्याविषयी थोडं सांगा.

- एक निर्माता म्हणून स्क्रिन प्ले वाचणे, प्रॉडक्शन लाईन ठरवणे, अशी अनेक कामे यामध्ये येतात. काम करणार्‍या कलाकारांचा एक दुवा म्हणून निर्मात्याने काम करणं फार गरजेचं असतं. चॅनेल आणि तुमची कलाकार मंडळी यांच्यामध्ये तुमचा संवाद राहणं हेही तितकचं महत्वाचं असतं. जर तुम्ही तुमच्या भूमिकेबाबत क्लियर असाल तर लोक तुम्हाला त्रास देत नाही. बर्‍याचदा लोकांच म्हणणं असतं की कलाकार , चॅनेलवाले खूप त्रास देतात. मात्र असं टाळणं आपल्या हातात असतं. याहीपेक्षा मी म्हणेण की तुमच्या चित्रपटाचा , मालिकेचा आशय महत्वाचा असतो.

* पूर्वीपासूनच या क्षेत्रात काम करण्याची इच्छा होती का?

- माझ्या लग्नाच्या आधीपासून मी या क्षेत्रात काम करत होते. काही वर्षांपूर्वी चॅनेल्स सुरू झाले. तेव्हापासून खूप काम मिळाल. मी ज्या दिवसापासून काम करायला सुरूवात केली तेव्हापासून मी सतत काम करत आहे. रॅम्पवर जे फॅशन डिझायनिंग केलं जातं, ते काम करणं मला फारसं रूचत नाही. त्यापेक्षा पूर्ण व्यक्तिरेखा तयार करायला मला आवडतं. त्या व्यक्तिरेखेचं राहणीमान , तिचे कपडे असा सगळा अभ्यास त्यामुळे करायला मिळतो. यासाठी संपूर्ण विचार करणं गरजेचा असतो.

* या क्षेत्रात केलेल्या इतर कामाबाबत सांगा
.
- रामगोपाल वर्मा यांचा 'गायब'हा हिंदी चित्रपट मी केला. त्यात रसिका जोशीचं कॅरेक्टर मी केलं होतं. त्यानंतर 'केप्र' मसाल्याच्या काही जाहिराती केल्या. त्याचबरोबर 'सातच्या आत घरात', 'आई शप्पथ', 'अगं बाई अरेच्या', 'वास्तुशास्त्र' केला. स्मिता तळवलकर, अमोल पालेकर ,जतीन वागळे यांच्यासाठी काम केलं. चंद्रकांत जोशी यांच्यासाठी केलेल्या कामाबद्दल
मला नुकताच राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला. टेलिव्हिजनसाठी 'हंगामा' या चॅनेलसाठी मालिका केल्या. 'झी स्माईल'साठी तीन हिंदी मालिका आणि 'अग्निहोत्र'याशिवाय काही मराठी मालिका केल्या आहेत. मला जितकं जास्त ब्रिफिंग मिळतं. तेवढ माझं काम जास्त चांगल होतं. ज्या गोष्टी आपल्याला पटत नाही त्या करणं मी टाळते. मालिकामधल्या बायका शालू नेसून दागिने घालून झोपतात, हे आपल्याला पटत नाही. असं काम मी करत नाही.

* आज मराठी चित्रपटांमध्ये होत असणार्‍या चांगल्या प्रयोगाचा तुमच्या क्षेत्राला देखील फायदा होतो का?

- नक्कीच. अगदी सुरूवातीपासून दिग्दर्शकांसोबत मी या कामात सहभागी असते. चित्रपटातल्या महत्वाच्या व्यक्तिरेखांबरोबर सर्व अभ्यास करून मगच कामाला सुरूवात होते. हिरो आणि हिरॉईन्सपेक्षा आज आर्टिस्ट्ना महत्व आलयं आणि ही चांगली बाब आहे.

* या क्षेत्रात नवोदितांनी काम करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींचा अभ्यास करायला हवा?

- सगळयात महत्वाचं म्हणजे या क्षेत्रात काम करण्याची तुम्हाला आवड हवी. इथे पैसा आहे पण त्यासाठी काम करण्याची तयारी हवी. तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल.

लवकरच 'झी मराठी'वर नवीन सुरू होणार्‍या मालिकेसाठी सध्या त्या काम करत आहेत. याशिवाय चित्रपटांसाठी त्या काम करत आहेत. एवढंच नाही तर गृहकृत्यदक्ष गृहिणींप्रमाणे त्या स्वयंपाकातही कुशल आहेत. व्हेज, नॉन व्हेज शिवाय इटालियन पदार्थ तयार करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. मुलाखतीदरम्यान त्यांनी एक किस्सा सांगितला, त्यांच्याकडे दिग्दर्शकांच्या मुली सहज आल्या होत्या. तेव्हा ब्रेकफास्टसाठी त्यांनी असे पाच पदार्थ मुलींना शिकवले की ज्या पदार्थांसाठी गॅस, ओव्हन कशाचीच गरज भासणार नाही. अशा सर्वच पातळ्यांवर यशस्वी असलेल्या गीता गोडबोले यांची मुलाखत खास तुमच्यासाठी.
तुम्हाला या मुलाखतीबद्दल वाटणार्‍या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत....
- मोहिनी वागेश्वरी