विजय केंकरे- विश्व मराठी नाटयसंमेलन : न्यू जर्सी

विजय केंकरे's picture

मे महिन्याच्या सुरूवातीला न्यू जर्सीमध्ये विश्व मराठी नाटयसंमेलन झोकात पार पडलं. खूप कष्ट घेऊन, त्रास सहन करून बरीच मंडळी न्यू जर्सीला पोहोचली होती. काही मंडळींना व्हिसा मिळाला होता, तर काहींना मिळाला नाही. त्याशिवाय माझ्या ओळखीच्या मंडळींनीं मला एक गोष्ट सांगितली त्यामुळे मला विशेष आनंद झाला. विश्व मराठी नाट्यसंमेलनात केवळ मराठीच नाही तर स्पॅनिश, फ्रेंच, ब्रिटीश डेलीगेट्स आले होते आणि त्यांच्या कानात इअरफोन असून आपले नाटयप्रयोग ती मंडळी त्यांच्या भाषेतून समजावून घेत होती.ही खरंच आनंदाची गोष्ट होती. माझा असा समज होता की, भारत- पाकिस्तान यांच्यात टोरँटोमध्ये जर क्रिकेटचे सामने होत असतील तर त्याला आपण विश्व करंडक म्हणत नाही. मग नाटयसंमेलनाला 'विश्व नाटयसंमेलन म्हणता येईल का,त्या दृष्ट्रीने विचार केल्यास खर्‍या अर्थाने हे विश्व नाटयसंमेलन होतं असं म्हणता येईल.
संमेलनामध्ये विचारमंथन होणं गरजेचं नाही तर कलावंतांनी रिलॅक्स होऊन सर्व कलावंतांनी एकत्र येऊन काढलेली ही 'पिकनिक' आहे, असा अनुभव नाटयसंमेलनात आला. ही पिकनिक काढावीशी वाटली 'हे ही नसे थोडके'. अकोल्याचा माणूस रंगभूमीबद्द्ल काय विचार करतो, समाजाची विचारसरणी कशी झाली आहे, असं मंथन नाटयसंमेलनातून घडतं, अशी माझी पामराची समजूत होती. पण खरंच ही 'पिकनिक' आहे हे पाहून आनंद वाटला. नाटयसंमेलनात कुठलाही परिसंवाद, नाटयसंवादविषयक चर्चा न ठेवता हे साध्य झालं हे महत्वाचं. वेगळी वैचारिक मंथन होण्याची गरज कोणालाच वाटली नाही.
तिथे पोहोचलेली मालिकांमधली कलावंत मंडळी वेळेत वेळ काढून नाटयसंमेलनाला आली त्यामुळे परमानंद झाला. एरव्ही नाटयप्रयोग करायला त्यांना दिग्दर्शक मंडळी सोडत नाही. आता पुढच्या एक वर्षापर्यंत नाटकांमध्ये काम न करण्यास हे कलाकार मोकळे !!
आपल्या मुंबईत बृहन्महाराष्ट्र महामंडळाचं अधिवेशन होतं आणि आपल्या हळदी-कुंकाला जशी परदेशी मंडळी येतात तसं हे हळदी-कुंकूं आपण न्यू जर्सीला घेऊन गेलो होतो, असं मला वाटतं. आपली नेहमीची वहिवाट मोडली, या वैचारिक धारिष्ट्याचं कौतूक करायला हवं. परदेशात नाटयसंमेलन होण्यास काहीच हरकत नाही. मात्र इकडच्या लोकांना नाटयसंमेलन का नाही? त्यांचा काय दोष? त्यांनी काय करावं? हे प्रश्न अनुत्तरीत राहतात.या नाटयसंमेलनात जी नाटकं निवडली गेली त्यांची निवड उत्तम होती. त्या निवडीला दाद द्यावीशी वाटते. 'कटयार काळजात घुसली', 'बेगम बर्वे','यु टर्न' या नाटकांबरोबरच जर बालनाटयही दाखवली गेली असती किंवा 'ग्रिप्सचं' एखादं नाटक असतं तर तिकडे येणार्‍या लहान मुलांना, तरूणांना मराठी रंगभूमीविषयी माहिती झाली असती.
नाटयसंमेलनाध्यक्षाच्या भाषणाची पुस्तिका ज्यांनी काढली त्यांनी त्या भाषणाची नवीन आवृत्ती काढावी की नाही, हा प्रश्नच आहे. जर अध्यक्ष वैचारिक भाषण करणारच नसतील तर त्या भाषणाचं जतन का करायचं हा प्रश्नच आहे. हे संमेलन ज्यांनी उत्तम घडवून आणलं त्या मोहन जोशी, डॉ. मीना नेरूरकर आदी सहकार्‍यांचे मनःपूर्वक आभार. अशी संमेलने सगळ्या देशात घडावीत, मराठी रंगभूमी सगळ्यांना समजावी,
एकंदरित या प्रपंचाला माझा सलाम !!!