'सारेगमपची निवेदिका'- प्रिया बापट

प्रिया बापट's picture


priya bapat.jpg
मी स्वत:ला खूप लकी समजते की माझ्यासारख्या नवीन कलाकाराला झी मराठीच्या 'आयडिया सारेगमप' या हिट रिअ‍ॅलिटी शोसाठी निवेदिका म्हणून मला काम करायला मिळालं. या क्षेत्रात पदार्पण केल्यानंतर खूप कमी वेळात मला इतकी मोठी संधी मिळाली. यापूर्वी मी बालकलाकार म्हणून काम केलं होतं. एका प्रायोगिक नाटकात काम केलं होतं. त्यानंतर प्रत्येक इतक्या कमी कालावधीत प्रत्येक प्रोजेक्टमधील विविधता मला अनुभवायला मिळाली. त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान तर समजतेच पण ज्यांनी मला ही कामे देऊ केली त्या सर्वांचे मी मन:पूर्वक आभार मानते.
त्यांनी माझ्यावर विश्वास ठेऊन मला काम दिले आणि त्यांनी माझ्याकडून ते करवूनही घेतले. तसचं 'झी मराठीच्या सारेगमप' कार्यक्रमाचे निवेदन 'तू करशील का'? असे विचारल्यावर मी नाही म्हणण्याचा प्रश्नचं नव्हता. पण असं काम मी पहिल्यांदाच करणार असल्यानं थोडं दडपण आलं होतं. माझ्या प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळी विचार करून काम केलं.
'शुभंकरोती' या मालिकेनंतर 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय'हा चित्रपट केला. त्यानंतर लगेचच माझ्याकडे 'आनंदीआनंद'या चित्रपटाची ऑफर आली. आणि हे प्रोजेक्ट संपता संपता मला 'नवा गडी नवं राज्य' या नाटकासाठी विचारलं गेलं. माझा आधीचा प्रोजेक्ट संपत आला म्हणून मी हे नाटक करायला हो म्हटलं. नाटकाची स्क्रिप्ट वाचल्यावर तर नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं. या नाटकाची आमची सगळीच टीम एका वयाची, नव्या उमेदीची असल्यानं नाटक करताना खूप मजा आली. नाटकाची केमिस्ट्री मस्त जमली. आता मी 'सारेगमपची' निवेदिका म्हणून काम करतेय.
योगायोग असा की, प्रत्येक प्रोजेक्टच्या वेळी फक्त तेच प्रोजेक्ट करत असल्यामुळे मला त्या कामाकडे पूर्णत: लक्षकेंद्रित करता आलं. आणि मला पूर्णपणे त्या त्या भूमिकेसाठी मेहनत घेता आली. 'शुभंकरोति'या मालिकेत माझी भूमिका कॅन्सर पेशंटची होती. या मालिकेत माझा आयुष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन पाहून अनेक कॅन्सर पेशंटना जीवनाकडे पाहण्याची एक नवी दृष्टि मिळाली.
आता 'आयडीया सारेगमप पर्व १० वे' याचे निवेदन करतानाही मला असचं पूर्ण लक्ष माझ्या प्रोजेक्टवर केंद्रित करायचं आहे. माझी तुलना कदाचित बाकी निवेदकांशी होईलही पण मी ठरवलयं की जशी मी आहे तसंच मी माझं काम करेन. कोणालाही फॉलो, कॉपी करण्यापेक्षा मला माझ्या स्टाईल मधे बोलायला आवडेल. कारण आंधळेपणाने मी जर कोणा दुसर्‍याची कॉपी केली तर ती चूक ठरेल. मला मात्र स्वत:ला स्वत: सारखं वागायला आवडतं. या माझ्या नव्या प्रोजेक्टमधे 'सारेगमपच्या' दिग्दर्शकांचा आणि 'झी मराठी वाहिनीच्या' सर्वांचा मला पाठिंबा आहे.