विभावरी चा ब्लॉग

विभावरी's picture

ओंजळभर पाणी

अथांग सागरातल ओंजळभर पाणी जेव्हा मी माझ्या हातात धरते,
तेव्हा वाटतं.....हे माझं..हक्काचं..
मग ते पाणी बोटातून ओघळून जाताना उघड्या डोळ्यांनी पहात राहते..
ओले हात फक्त उरतात तेव्हा कळत...
सागराला ओंजळीत धरता येणार नाही मला कधीच..
तो माझा नाही
ते ओंजळभर पाणीही माझं नाही.....
माझं पाणी.... फक्त डोळ्यातलं.....

विभावरी's picture

न सुचलेल्या कवितेचं भूत

माझ्या न सुचलेल्या कवितेचं भूत रोज माझ्या मानगुटीवर बसतं
गोंधळलेल्या,काळ्या,अशांत,जीवघेण्या रात्री.
जेव्हा माझ्या अपुर्या स्वप्नांचे,अतृप्त वासनांचे,फसलेल्या यमकांचे,चुकलेल्या गणितांचे,अस्फुट चित्कारांचे घाव बसतात माझ्या मनावर.

जगण्याच्या चौकटी आखताना आपसूक बाजूला सारलेलं,
आत आत कुठेतरी दाबलेलं,
पचवलंय असं वाटलेलं,
नाकारलंय असं मानलेलं,
'उद्या पाहू' च्या सदरात मोडलेलं.
स्वप्नाळू वगैरे डोळ्यांना न झेपलेलं,
मोडक्या खांद्यांना नं पेललेल
पंख बांधून पदरात लपवलेलं.
साखरेत घोळून पोटात दडवलेलं,
माझं, तुझं, तिचं, त्याचं...
सगळं पिशाच्च्यासारख उभं ठाकतं समोर.

विभावरी's picture

का गं तुझे डोळे ओले??

माझ्या आय टच शी खेळत होते. इतक्या पसार्यतून् काहीतरी एक निवडायचं आणि ऐकायचं. त्या क्षणी जे वाटेल ते.... अचानक दिसलं 'जो तुम तोडो पिया मै नाही तोडू' 'सिलसिला मधलं नाही, जुनं,,झनक झनक पायल बाजे'!..लता दीदींचा तो स्वर्गीय स्वर, वसंत देसाईंच अद्भुत संगीत....ऐकता ऐकता एक ओळ आली ' तुम मेरे ठाकूर, मै तेरी दासी' ..आणि मी थबकले. तंद्री मोडली..कधीकधी एखादा शब्द, एखादं सहज म्हणून केलेलं विधान एक भलतीच विचारधारा सुरु करून जातं. विनाकारण, संदर्भहीन..'मी तुझी दासी. ...टोकाचं समर्पण आहे हे...स्वतःला विसरून कुणाच्या तरी स्वाधीन व्हायचं. मीराबाईच करू जाणो!! आणि समोर कृष्ण होता!! भलता सलता नाही कुणी!

Syndicate content