अभिनय 'सिध्द' कलाकार - सिध्दार्थ चांदेकर

मम प्रतिनिधी's picture
Upload Image: 

आज मालिका, रंगभूमी आणि मराठी चित्रपट या तिन्ही माध्यमांमध्ये अनेक तरूण कलाकार काम करताना दिसतात. यामध्ये चॉकलेट बॉयची व्यक्तिरेखा साकारणारे अनेक कलाकार आहेत. मात्र सुरूवातीपासून वैविध्यपूर्ण काम करणारे कलाकार कमीच. या कलाकारांमध्ये वरचा क्रमांक लागतो सिध्दार्थ चांदेकरचा.
'रायगडाला जेव्हा जाग येते', 'रुसवा सोड सखे', 'शोध घेता घेता',‘कवडसे, 'हमने जीना सिख लिया', 'बाईमाणूस', 'झेंडा', '३१डिसेंबर' असो किंवा नितीन चंद्रकांत देसाईंच्या मोठया चित्रपटात'बालगंधर्व'मध्ये मिळालेली संधी असो, या सगळयाच क्षेत्रात सिध्दार्थ चांदेकरने स्वत:ची क्षमता सिध्द केली आहे. मराठी रंगभूमी, मालिका, चित्रपट या सगळयाच क्षेत्रात तो आज लोकप्रिय आहे. नुकतीच ई टीव्हीवर त्याची 'मेजवानी परिपूर्ण किचन'या रेसिपी शोमधली एंट्री सगळयांनाच आवडली आहे.
सिध्दार्थने लहानपणापासूनच 'दुरदर्शन' या माध्यमाद्वारे त्याच्या आवडत्या अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. दुसरीत असताना त्याने 'थरार' या मालिकेत अभिनय केला होता. तर 'कथा-कथी', 'अग्निहोत्र', 'कशाला उद्याची बात' अशा मराठी मालिकांतून आपली अभिनय क्षेत्रातील वाटचाल सुरु केली. केवळ एवढेच नाही तर 'मिटकॉन', 'टाटा इंडिकॉम', 'युनिनॉर', 'केप्र मसाले', 'पॅनकार्ड क्लब', 'केसरी टुर्स अ‍ॅन्ड ट्रव्हल्स' अशा विविध जाहिरातींतून तो आपल्याला दिसतो. अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवण्यासाठी भरारी मारण्याचा कसोशीने प्रयत्न करणार्‍या सिध्दार्थ चांदेकर याच्याशी मम टीमने 'उगवते तारे' या सदराच्या निमित्ताने मारलेल्या गप्पा.....
199441_1928444897667_1438547688_32294469_8359511_n_0.jpg

* तुझे या क्षेत्रातील प्रेरणा स्थान कोण आहेत?

माझी आई ही माझे प्रेरणास्थान आहे. ती गेली तीस वर्ष नाटकात अभिनय करत आहे. तिच्याकडे बघूनच मला या क्षेत्रात यावंसं वाटलं. सध्या ती नाटकात काम करीत नाहीये. मी या क्षेत्रात स्थिरस्थावर होईपर्यंत ती आता काम करणार नाहीये. तिच्यामुळेच मी फक्त या क्षेत्रात आलो आहे. त्यामुळे या क्षेत्रात माझी सुरूवात तिच्यापासूनच झाली.

* मराठी नाटक आणि चित्रपटांप्रमाणे हिंदी चित्रपटात काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते, याबद्दल तू काय सांगशील ?

- एका कलाकाराप्रमाणे मला सर्व माध्यमांमध्ये काम करायला आवडेल. जर मला चांगल्या हिंदी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली तर मी नक्की
च त्याचा विचार करेन.

* विनोदी चित्रपटांकडून कलात्मक, गंभीर विषयांच्या निर्मितीकडे मराठी चित्रपट सृष्टीची वाटचाल सुरू आहे, हा बदल या क्षेत्रातील नव्या पिढीच्या दृष्टीने पूरक आहे का?

- हा बदल नक्कीच पूरक आहे असं म्हटलं पाहिजे. सहज, साधेपणाने, सोप्या पध्दतीने चित्रपट निर्माण होत आहेत. फार दिखाऊपणा टाळून जे चित्रपट तयार होतात ते नक्कीच सगळयांना आवडतात. आपल्या इथे जे चित्रपट निर्माण होतात त्यातले काही सीन उगाचच वगळले जातात. तसं न करता कोणाचीही कॉपी न करता 'सिम्प्लीसिटीचा' वापर करीत चित्रपट निर्मिती झाली पाहिजे. कोणाचीही नक्कल न करता चित्रपट काढले की ते हिट होतात.
प्रत्येकाने आपापल्या कल्पनेने केलेली निर्मिती ही नेहमी उत्तमच होते, हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सध्या अशाच प्रकारची निर्मिती होत आहे. त्यामुळे हा बदल आम्हा नवकलाकारांना चांगल्या संधी मिळवून देणारा आहे.
188890_1928446857716_1438547688_32294478_527356_n_0.jpg

* तू चित्रपट, नाटकं, मालिका, जाहिराती अशा विविध क्षेत्रात काम केले आहेस, या माध्यमांपैकी तुला कुठलं माध्यम जास्त आवडतं.

-मला नाटकात काम करायला आवडतं. कारण तो अनुभव खूप शिकवणारा असतो. आपल्या समोर आपल्या कामाला तात्काळ प्रतिसाद देणारा प्रेक्षक वर्ग असतो. आणि त्यामुळे ऑन स्टेज अभिनय करताना खूप धमाल येते. अर्थात मालिका आणि चित्रपटांचं बलस्थान वेगळं आहे. पण मी ही सगळी माध्यमं एन्जॉय करतो.

* या माध्यमांपैकी तू कुठलं माध्यम करिअर म्हणून निवडण्यास प्राधान्य देशील ?

-'अभिनय' हे क्षेत्र मला करिअर म्हणून निवडायला आवडेल. मला तिन्ही गोष्टी उत्तम पध्दतीने करायच्या आहेत. माझ्यातील जे काही टॅलेंट आहे ते प्रेक्षकांपर्यंत प्रामाणिक प्रयत्नांनी पोहोचवायचे आहे. नाटक आणि चित्रपट यात मला चांगला समन्वय साधता आला तर मला खूप काही उत्तम गोष्टी करायला आवडतील.

* आजवर अनेक ज्येष्ट कलाकारांबरोबर काम केलं आहेस, त्यांच्यासोबत काम करताना दडपण जाणवलं का ?

- बर्‍याचदा असं होतं की बाहेर ऎकलेलं असतं तेच खरं मानून आपण या अनुभवी कलाकारांना भेटतो. मोहन जोशी, विक्रम गोखले, शरद पोंक्षे यांच्याबद्दल मी असंच ऎकलं होतं की ते खूप कडक शिस्तीचे आहेत. पण प्रत्यक्ष त्यांच्या बरोबर जेव्हा काम केलं तेव्हा लक्षात आलं की ते जरी चिडले, शिस्तप्रिय असले तरी ते मैत्रीपूर्ण नातेसंबंध सांभळणारे आहेत. ते आपणहून गप्पा मारायचे, पत्ते, क्रिकेटही आम्ही खेळायचो. अशा अनुभवी कलाकारांबरोबरचा काळ आम्हाला खूप काही शिकवतो.

* या कलाकारांबरोबर काम करतानाचा तुझ्या आठवणीतला एखादा मजेशीर किस्सा किंवा अनुभव सांगशील का?

- 'अग्निहोत्र' मालिकेचं शुटिंग चालू होतं. दुपारची जेवणं करून आम्ही सीन करायला सेटवर आलो पण कोणाचाच मूड नव्हता. आणि त्यादिवशी आम्हाला चार सीन करायचे होते. आमच्या मालिकेचे दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले की शुटिंग थांबवा आणि चला आपण क्रिकेट खेळूया. आणि मग आम्ही २-३तास क्रिकेट खेळलो. त्याशिवाय नंतर अडीच तासात चार सीनचं काम सगळयांनी आनंदानं केलं.

* चित्रपटात काम करण्यासाठी रंगभूमीवर आधी काम करण्याची गरज आहे का? याबाबत तुझं काय मत आहे ?

- मला वाटतं की मूळात तुम्हाला अभिनय शिकण्यासाठी थिएटरचा खूप उपयोग होतो. एकदा तुमचा पाया पक्का असेल तर तुम्हाला उत्तम काम करता येतं. अभिनयासाठी लागणार्‍या अनेक बारीक निरीक्षणं तुम्ही थिएटरमधून शिकत असता. आज आपण पाहतो की अनेक मोठे कलाकार हे थिएटरमधून शिकून आलेले आहेत. त्याचा फायदा अनेक चांगल्या भूमिका समरसून करण्यासाठी होतो.

* नितीन चंद्रकांत देसाई यांच्या 'बालगंर्धव'चित्रपटाबद्दल सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे, या तुझ्या नवीन चित्रपटाबद्दल काय सांगशील ?

- आज मराठी चित्रपटसृष्टीत सकस आणि दर्जेदार विषय हाताळले जात आहेत. परेश मोकाशी यांनी दिग्दर्शित केलेला 'हरिश्चंद्राची फॅक्टरी' चित्रपट खूप नावाजला गेला. भारतीय चित्रपटक्षेत्रातलं त्यांचं योगदान अधोरेखित केलं गेलं. त्याचप्रमाणे संगीत रंगभूमीवर 'बालगंधर्व' याचं स्थान अबाधित आहे. त्यांची कामगिरी या चित्रपटाव्दारे लोकांपर्यंत नक्की पोहोचेल, असा मला विश्वास वाटतो. आणि पुढच्या पिढीला 'बालगंधर्व' काय होते हे नक्की या चित्रपटाव्दारे कळेल.
सिध्दार्थच्या पुढील कामासाठी 'मम टीम'कडून शुभेच्छा!
सिध्दार्थची मुलाखत कशी वाटली ते नक्की आम्हाला कळवा. आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत.

- शिल्पा भावे