कौशल इनामदार यांची मुलाखत

संगीतकार कौशल इनामदार यांना त्यांनी संगीतबध्द केलेल्या 'मराठी अभिमान गीताबद्दल' 'स्वातंत्र्यवीर सावरकर शब्दस्वर पुरस्कार' नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळाल्यानंतर सर्व रसिकांनी त्यांचं मनापासून कौतूक केलं. अर्थात 'मम टीम' देखील यामध्ये मागे नव्हती. आम्ही कौशल इनामदारांशी या पुरस्काराबाबत बोललो असताना त्यांनी यासंदर्भात दिलखुलास संवाद साधला. हा संवाद खास आपल्यासाठी.........
* 'शब्दस्वर'पुरस्कार मिळाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती ?
- अर्थातच मला खूप आनंद झाला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावांन हा पुरस्कार मिळाल्यामुळे जबाबदारी वाढली आहे. अशा पुरस्कारांमुळे खूप प्रेरणा मिळते. हा पुरस्कार स्विकारताना मी कृतज्ञ आहे. आपल्या कामाची दखल घेतली जाते, हे सुखावह असतं, त्याबद्द्ल मी निनाद संस्थेचा आभारी आहे.
kaushal.jpg
* 'मराठी अभिमान गीताचा' प्रतिसाद कसा आहे?
- या गीताला मिळालेला प्रतिसाद खूप जबरदस्त आहे. श्रोते आणि संगीताबद्द्ल ज्यांना प्रेम आहे, अशा सर्वांनी या गीताला भरभरून प्रतिसाद दिला. केवळ भारतात नाही तर भारताबाहेरही या गीताला तेवढाच प्रतिसाद मिळाला आहे. अमेरिकेतील एका कंपनीने एक आयपोड अ‍ॅप्लिकेशन तयार केलं आहे. त्यात या गाण्याचा समावेश केला आहे. यामध्ये संपूर्ण जगाचा नकाशा आहे. त्यामुळे किती लोकं हे गीत पाहतात, ऐकू शकतात ते कळू शकत.
साहित्य संमेलनात अमिताभने जेव्हा या गाण्याविषयी कौतूक केलं तेव्हा तो क्षण कसा होता?
- तो क्षण खरंच माझ्यासाठी अनपेक्षित होता. मी भारावलेल्या अवस्थेत होतो. गंमत म्हणजे अमिताभच्या भाषणात एकाही जिवंत माणसाचा उल्लेख नव्हता. त्यात त्यांनी माझा उल्लेख केला. त्या गीताबद्द्ल त्यांना कुणी सांगितलं नव्हतं. त्यांनी स्वतः तो यू ट्यूबवरून मिळवला तो पाहिला. हे खूप वेगळं होतं माझ्यासाठी. आणि जेव्हा दुसर्‍या दिवशी वृत्तपत्रांत ते सगळं वाचलं तेव्हा पुन्हा तो क्षण जगायला मिळाला. एवढ्या सगळ्या गायकांना तुम्ही एकत्र बांधलंत, या शब्दांनी त्यांनी माझा सन्मान केला. त्यामुळे गाणं सर्वदूर पोहचलं.
* केलेल्या कामाबद्द्ल पुरस्कार मिळणं तुमच्या दृष्ट्रीने किती महत्त्वांच असतं?
- मला वाटतं ते खूप महत्त्वाचं असतं. संगीतकार कार्य्रत असताना पुरस्कार मिळणं जास्त महत्वाचं. आपल्या कामाची दखल घेतली जाते तेव्हा नवीन काम करण्यास प्रोत्साहन मिळतं.
* पुढच्या प्रोजेक्टसबद्द्ल आता खूप जबाबदारी वाढली आहे असं वाटतं का?
- मी मागच्या कामाच्या सावलीत कधीच काम करत नाही. आपण फक्त चांगलं काम करू शकतो. थोडे दिवस मी कामातून सुट्टी घेतली आहे.
मी केवळ काम केलं आहे. यातून इतर लोकांनी असं काम केलं पाहिजे. या कामाची सरकारनं या कामाची दखल घेतली पाहिजे. महाराष्ट्र गीताच्या बाबत जी आपण चूक केली ती मराठी अभिमान गीताबाबत होऊ नये असं वाटतं. हे गीत लहान मुलांनी शिकावं, सर्वांनी गावं असं वाटतं.
मराठी अभिमान गीताचं काम केल्यानंतरही कौशल इनामदार जमिनीवर आहेत. त्यांना या पुरस्काराबद्द्ल 'मम टीम'कडून अभिनंदन.