नवोदितांचे 'वैभव'- वैभव तत्ववादी

मम प्रतिनिधी's picture
Upload Image: 

'गुंफण', 'खास आपल्यासाठी', 'खेळ मांडला', 'प्रवेश दुसरा'या मराठी नाटकांबरोबर 'अब तो आदतसी है','याहू'ही हिंदी नाटकं आणि 'लाईफ ऑन ए सिंगल बेड' या इंग्रजी अशा विविध भाषेतील नाटकांतून वैभव तत्ववादीने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. रंगभूमीबरोबरच 'अमरप्रेम'आणि 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' या डेली सोपमुळे वैभव लोकप्रिय झाला. 'पुरुषोत्तम करंडक', 'संजीव करंडक','भारत करंडक', 'फिरोदिया करंडक' अशा विविध स्पर्धांतून सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे पारितोषिक त्याने पटकावले. आता तो सिनेसृष्टीकडे आपली पावले वळवत आहे. अशा या गुणी कलाकाराच्या मनोरंजन क्षेत्रातील प्रगतीचा मागोवा घेण्याचा हा प्रयत्न. 'उगवते तारे' या सदराच्या निमित्ताने वैभव तत्त्ववादीशी साधलेला हा संवाद.....

* अभिनय करत असताना तुझ्या डोळयासमोर नक्कीच कुणीतरी असतील, त्यांच्याविषयी काय सांगशील?

- खरं सांगायचं तर इथे मी बर्‍याच कमी जणांना ओळखतो. माझी वयाची पहिली १८ वर्ष मी नागपूरला असल्याने मी या क्षेत्रातल्या सगळ्यांना पडद्यावरच पाहिले आहे. पण एक नक्की इथे जो कोणी येतो तो या 'इंडस्ट्री'कडून खूप काही शिकत असतो. स्वतः ही 'इंडस्ट्री' एक प्रेरणा ठरते इथल्या प्रत्येकालाच. पण माझ्या आई-बाबांचं सहकार्य आणि खंबीर पाठिंब्याशिवाय हे शक्य झाले नसते हे ही तेवढंचं खरं आहे. माझ्या आईने मला डान्सच्या क्लासला तिसर्‍या-चौथ्या वर्षापासून घातले होते. त्याचा मला आत्ताही खूप उपयोग होत आहे. माझ्यातील कसब त्यांनी ओळखलं म्हणून त्यांनी माझ्या या आवडीच्या क्षेत्रात जाण्यास परवानगी दिली.

* तुला मिळालेली पहिली संधी कोणती?

- एक पात्री प्रयोग मी शाळेपासूनच करत आलो आहे. तेव्हा माझे बाबा मला स्वतः त्या स्पर्धेच्या ठिकाणी घेऊन जात असत. पण जेव्हा मला 'सीओईपी'ला इंजिनीअरींग कॉलेजला प्रवेश मिळाला ती माझी खरी संधी होती. माझ्या बाबांच्या सहमतीने मी इथे आलो आणि अनेक एकांकिकातून अभिनय केला. पुरुषोत्तम करंडक केल्याने मला अनेक नवीन संधी मिळाल्या.'सीओईपी'त असताना मी सात एकांकिकात काम केले होते.
vai.jpg

* चित्रपट, शॉर्ट फिल्म, नाटकं, मालिका अशा विविध क्षेत्रात आजवर तू काम केलं आहेस, यातील कोणत्या क्षेत्राकडे तू करिअर करायचे म्हणून पाहतोस?

- करिअर म्हणून म्हटले तर मी चित्रपटाकडे त्यादृष्टिनं पाहतो. पण मला नाटकातही काम करायला आवडतं त्यामुळे मी अधून-मधून ते ही काम करणार आहे. पण या क्षेत्रात करिअर करायचं असं मी आठवीत असताना ठरवलं होतं. त्यामुळे माध्यम कुठलं का असेना मला या क्षेत्रात काम करायचं आहे, हे नक्की.

* जर तुला हेच क्षेत्र करिअरसाठी निवडायचं होतं तर मग तू इंजिनीअरींगला का प्रवेश घेतलास?

- इंजिनीअरींग ही एक पदवी न रहाता तो एक 'अ‍ॅटिटयुड'आहे असं मला वाटतं. पण इंजिनीअरींगला आल्याने मला अनेक नव्या संधी मिळाल्या त्यामुळे इथे येऊन माझं काहीही नुकसान झालेलं नाही. उलट इथे येऊन माझं ध्येय निश्चित झालं.

* तू अनेक नाटक आणि चित्रपटात भूमिका केल्या आहेस तसचं मालिकेमधे ही काम करतोस तुला कोणत्या क्षेत्रात मनापासून काम करायला आवडेल?

- मला अभिनय करायला आवडतो. त्यामुळे कोणतेही क्षेत्र असले तरी मला जे आवडतं तेच काम मी करतो. त्यामुळे स्पेसिफिक हेच करणार आणि बाकी काही करणार नाही असं मूळीच नाही.

* चित्रपटात काम करण्यासाठी रंगभूमीवर आधी काम करण्याची गरज असते का, तुला काय वाटतं?

- मला वाटतं, रंगभूमी हा अभिनयाचा पाया आहे. सर्वोतोपरी इथल्या कामाच्या अनुभवाचा आपल्या पुढच्या प्रत्येक कामात फायदा होतोच. पण ही दोन्ही माध्यमं वेगळी आहेत. रंगभूमी नंतर कॅमेरासमोर उभं रहायचं तर सगळयानांच टेन्शन येत असेल. पण ते उभं रहाण्याची हिंमत रंगभूमीवर काम केल्यामुळे मिळते असं मला वाटतं. म्हणून प्रत्येक कलाकार रंगभूमीवर काम करण्यासाठी उत्सुक असतो.
vai added 3.jpg

* आजवर अनेक मोठया कलाकारांबरोबर तू काम केले आहेस,त्याबाबतचा तुझा अनुभव कसा होता?

- मी आजवर अनेक ज्येष्ट कलाकारांबरोबर काम केलं आहे. माझ्या आगामी 'पाऊलवाट'या महेश मांजरेकरांच्या चित्रपटात महेशजी आणि सचिन खेडेकरबरोबर काम करण्याची मला संधी मिळाली त्यातच मी खूप काही शिकलो. सचिनजी माझे या चित्रपटात वडील आहेत. त्यांचे आणि माझे या चित्रपटात काही सीन आहेत. पण त्या प्रत्येक वेळी अभिनय कसा करु नको हे त्यांनी मला सांगितलं. आणि नेमकं काय करावं हे सांगणारे असे कलाकार मला या चित्रपटांमुळे अनुभवता आले. महेशजींचा तर मी आधी पासूनच फॅन होतो. शुटिंगच्या पहिल्या दिवशी माझी ओळख त्यांनी करुन दिली. माझ्यासारख्या छोटया कलाकाराला त्यांनी लक्षात ठेवलं त्याचा मला खूप आनंद झाला. याचित्रपटाशिवाय 'फक्त लढ म्हणा' हा चित्रपटही मी करीत आहे.
वैभवच्या आगामी कामांतून तो आपल्याला भेटणारच आहे, त्याच्या पुढील भविष्यासाठी 'मम'टीमकडून त्याला शुभेच्छा!

- शिल्पा भावे.