'बहुगुणी स्पृहा' - स्पृहा जोशी

मम प्रतिनिधी's picture
Upload Image: 

मराठी चित्रपट, मालिका, रंगभूमीवर आज अनेक नवीन कलाकार आपल्यासमोर विविध माध्यमांतून येतात. या क्षेत्रातील त्यांचा वावर आत्मविश्वासपूर्ण असतो. केवळ अभिनयाच्या क्षेत्रात नाही तर लेखन, दिगदर्शन अशा अनेक आघाडया ते यशस्वीपणे सांभाळतात. अनेक पातळयांवर यशस्वीपणे काम करताना पाहून या नवीन पिढीचे सर्वांनाच कौतुक वाटते. एवढं काम करूनही ही पिढी स्व:तच्या मर्यादा जाणून आहे. या कलाकारांचे विचार, त्यांची स्वप्न, आशा - अपेक्षा सर्वांना कळाव्यात हा विचार डोळयांसमोर ठेवून 'मराठी मनोरंजन संकेतस्थळ''उगवते तारे' हे नवीन सदर आजपासून सुरू करत आहोत. यापूर्वी सुरू केलेल्या अनेक उपक्रमांना तुम्ही उत्तम प्रतिसाद दिला आहे. तो प्रतिसाद या सदरालाही मिळेल असा आम्हाला विश्वास वाटतो. हे सदर दर सोमवारी 'ममच्या'संकेतस्थळावर आपल्याला वाचायला मिळेल. तुम्हाला हे सदर कसे वाटले त्याबाबतच्या सूचना, प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला नक्की कळवा. आम्ही तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहोत. या सदराची सुरूवात करत आहोत स्पृहा जोशीच्या मुलाखतीतून .....

एक उत्तम अभिनेत्री, लेखिका, कवयित्री आणि 'बालश्री'या राष्ट्रपती पुरस्काराची मानकरी ठरलेली स्पृहा जोशी आजची आघाडीची गुणी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.'उमा बंड' नाव ऎकले की अग्निहोत्र मधील स्पृहा जोशीच सगळयांना आठवते. केवळ एवढेच नाही तर 'चांदणचुरा' या तिच्या पहिल्या काव्यसंग्रहाने तिचं नाव सगळीकडे दूरवर पोहोचवलं होतं. मालिका, चित्रपट आणि रंगभूमीवरील तिचा सहज वावर तिच्या उत्तम अभिनयगुणाची ओळख करून देतो. सुनील बर्वेच्या 'हर्बेरियम'उपक्रमांतर्गत 'लहानपणा देगा देवा' या नाटकाने तिला वाहवा मिळवून दिली. अशा गुणी अभिनेत्रीचा हा प्रवास जाणून घेण्याची इच्छा व्यक्त करून तिच्याशी मम टिमने 'उगवते तारे' या सदराच्या निमित्ताने साधलेला हा संवाद......
DSC09097_0.jpg

* विनोदी चित्रपटांबरोबरच कलात्मक, गंभीर विषय आज मराठी चित्रपटसृष्टीत हाताळले जातात याची तुम्हाला मदत होते का?

- मला असं वाटत की, ही आमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. मराठी चित्रपट
सृष्टीमध्ये उत्तमोत्तम संधी मिळत आहेत आणि याचा फायदा आमच्यासारख्या
तरुणांना होत आहे. 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'वळु', 'विहीर','देउळ' या सारख्या
सकस आणि दर्जेदार चित्रपटांची निर्मिती होत आहे. तरुणांना आकर्षित करतील अशा विषयांवर चित्रपट येत आहेत आणि मला याचा अभिमान वाटतो की, मी या काळातील एक कलाकार म्हणून काम करत आहे.

* तुला मिळालेली पहिली संधी कोणती? त्याचा तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी कसा फायदा झाला ?

- मी बालमोहन विद्यामंदिरची विद्यार्थिनी आहे. सातवीमध्ये असताना माझ्या
चित्रकलेच्या शिक्षिका विद्या पटवर्धन यांनी मला 'दे धमाल' या मालिकेमध्ये
काम करण्याची संधी दिली. त्यामुळे लहानपणीच 'कॅमेरा' या गोष्टीची
भीतीच निघून गेली.

* या क्षेत्रातील तुझे प्रेरणास्थान कोण आहेत?

- 'स्मिता पाटील' या माझ्या आयुष्यातील प्रेरणास्थान आहेत. जर
'अभिनेत्री' या शब्दाची व्याख्या करायची असेल तर ती केवळ दोन शब्दांमध्ये करता येईल ती म्हणजे 'स्मिता पाटील'.
_DSC2799_0.jpg

* 'अग्निहोत्रमध्ये'ज्येष्ट आणि तरूण कलाकारांबरोबरचा तुझा अनुभव कसा होता?

- मला असं वाटतं की माझं नशीब खूप चांगलं आहे की लहान वयातच मला मोहन आगाशे, मोहन जोशी, शरद पोंक्षे, श्रीरंग गोडबोले, ईला भाटे, शुभांगी गोखले,विनय आपटे अशा अनेक दिग्ग्जांसोबत काम करण्याची संधी मिळाली. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत याची जाणीव त्यांनी होऊ दिली नाही. सीनमधले बारकावे काय आहेत अजून तो उत्तम कसा करता येईल हे आमच्या वयाचे होऊन त्यांनी आम्हाला समजावून सांगितलं. मस्त मजा करत आम्ही सर्वांनी काम केलं. सीन संपला की आम्ही क्रिकेट खेळायचो आणि आम्ही सगळी मुले
एकत्र आलो की, त्या सगळयांना आम्ही भंडावून सोडायचो सिद्धार्थ चांदेकर हा
त्यातला ‘मेरुमणी’ होता. एकंदरित ही मालिका माझ्यासाठी खूप संस्मरणीय ठरली.

* मालिका आणि चित्रपटांबरोबरच तुझ्याकडे रंगभूमीवर काम करण्याचा अनुभव आहे, थिएटरचा अनुभव त्यासाठी महत्वाचा असतो का, याबाबत काय सांगशील?

- मला वाटतं की नक्कीच थिएटरची गरज आहे. कारण मालिका आणि चित्रपटांमध्ये काम करताना थिएटरचा खूप उपयोग होतो. थिएटरमुळे तुमचा अभिनयाचा पाया पक्का होतो. कारण नाटक करत असताना आपल्याला सतत सुधारणा करायची सवय लागते. नवीन गोष्टी, प्रयोग करुन कसं चांगलं दिसेल ते आपण पहात असतो. आणि एकांकिका हे एक प्रिपरेटरी ग्राउंड आहे इथे आपण मजा करत करत शिकतो असं मला वाटतं.

* आजच्या काळात सगळीकडे 'मराठी' चं वादळ आहे त्याबद्दल तुला काय वाटतं ?

- 'मराठीचं' राजकारण होऊ नये असं मला मनापासून वाटतं, सगळे म्हण्तात की मराठी भाषेची स्थिती वाईट झाली आहे. पण मला असं वाटतं की ‘भाषा कधीच मरत नाही’ आपण फेसबुक किंवा ऑर्कुट वर बघतो मराठी साहित्य, मराठी ब्लॉग याचं वाचन अनेकजण करतात. मराठी नाटक आजही आवडीने लोक पाहतात. भावगीतांची मैफील लोकांना ऎकायला आवडते. यासर्व गोष्टीं निश्चितच मराठी भाषेची भरभराट होण्यास मदत करतील.
DSC04089_0.jpg

* सध्या 'विश्वकप'चा सगळीकडे फिवर आहे, तुझा आवडता क्रिकेटपटू कोण, तू काय शुभेच्छा देशील ?

- 'सचिन तेंडुलकर' हा माझ्यासाठी क्रिकेटचा देव आहे आणि मी त्याची खूप मोठी भक्त आहे. आणि वर्ल्डकपसाठी देव प्रत्येक मॅचला महेंद्रसिंग धोनीला सदसदविवेकबुध्दी देवो हीच माझी इच्छा.

* मराठी मनोरंजनच्या या 'उगवते तारे' या नवीन सदराविषयी तुला काय वाटतं ?

- मला 'मराठी मनोरंजन'चे हे सदर मला खूप मनापासून आवडलं आणि हेच नाही तर त्यांचे सगळेच उपक्रम हे वेगळे असतात आणि आम्हा कलाकारांना मिळालेले हे एक उत्तम व्यासपीठ आहे. मराठी मनोरंजनला त्यांच्या पुढच्या सर्व
उपक्रमांसाठी माझ्या मनापासून शुभेच्छा !

मम प्रतिनिधी .........