'सक्षम' कलाकार - सक्षम कुलकर्णी

मम प्रतिनिधी's picture
Upload Image: 

'पक पक पकाक', 'शिक्षणाच्या आईचा घो!', 'शेवरी', 'दे धक्का', 'लोणावळा
बायपास मराठी चित्रपट असो किंवा 'अल्लाह के बंदे', 'रन में फन',
'अक्षरशाही जिंदाबाद', 'इंडिया एक्सप्रेस', 'संवेदन', 'ममता का साया' इतर
भाषिक चित्रपट, लघुपट, माहितीपट करणार्‍या कलाकाराला आता तुम्ही ओळखलंच
असेल हो त्या कलाकाराचं नावं आहे, सक्षम कुलकर्णी . केवळ चित्रपटच नाही
तर नाटकातही सक्षमने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.'आली सुट्टी',
'ढब्बू ढोल रिमोट गोल', 'आईशप्पथ', 'धरपकड', 'पण आम्हाला खेळायचयं' अशा
मराठी
नाटकात त्याने यापूर्वी काम केलं आहे. याशिवाय सध्या तो एका इंग्रजी
नाटकात काम करत आहे.
मराठी चित्रपटांबरोबरच त्याने मराठी आणि हिंदी मालिकांतूनही
भूमिका केल्या आहेत. 'श्रावणसरी', 'पिंपळपान', 'एक होता राजा', 'रिश्ते'
या मालिकांमधूनही त्याने काम केलं आहे. अशा हरहुन्नरी कलाकाराशी 'मम
टीमने' 'उगवते तारे सदरासाठी संवाद साधला असता सक्षमने मनसोक्त गप्पा
मारल्या. हा संवाद फक्त तुमच्यासाठी....

* अभिनयक्षेत्रातला तुझा प्रवास एक बालकलाकार म्हणून सुरू झाला, या क्षेत्रातल्या तुझ्या प्रवासाबद्दल काय सांगशील ?
-'श्रावणसरी' या मालिकेसाठी मी पहिल्यांदा शाळेत असताना काम केले होते.
ती माझी पहिली संधी म्हणता येईल. 'इंडियन मॅजिक आय'मधून त्यासाठी मला
निवडलं गेलं होतं. आणि या नंतर मला झी टीव्हीवरच्या 'रिश्ते' या मालिकेत
भूमिका मिळाली. या भूमिकेनंतर मला हळूहळू अनेक चांगल्या भूमिका करण्याची
संधी मिळाली. त्याच दरम्यान ऋषी देशपांडे हे 'रन में फन' हा चित्रपट तयार
करत होते. या चित्रपटात काम करायची मला संधी मिळाली. हे माझ्यासाठी खूप
महत्त्वाचं होतं.
IMG_0831.JPG

* आजवर तू अनेक नावाजलेल्या आणि ज्येष्ट कलाकारांसोबत काम केलं आहे त्याबाबतचा तुझा अनुभव कसा होता ?
- मला ज्या ज्या लोकांबरोबर काम करायची संधी मिळाली ते सगळेच
माझ्यापेक्षा खूप ज्येष्ट होते त्यामुळे नक्कीच माझा फायदा झाला. मला
त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकता आल्या. त्यांनी मला अनेक गोष्टी समजवून
सांगितल्या. या सगळ्या मार्गदर्शनाचा मला नक्की पुढे फायदा होईल आणि ते
मी लक्षात ठेवून करेन.

* कलाकारांबरोबर काम करतानाचा एखादा आठवणीत रहाणारा अनुभव किंवा गंमतीशीर किस्सा सांगशील.
- नक्कीच असे अनेक अनुभव मला आले. त्यातला लक्षात राहाण्यासारखा म्हणजे,
'पक पक पकाक'या चित्रपटाचा. त्यामध्ये एक सीन असा होता की मी भुताची दाढी
कापतो त्यावेळी माझा हात फ्रेमच्या बाहेर जात होता. मला नाना काकांनी
(नाना पाटेकर यांनी) समजावले की तो प्रसंग कसा करायचा ते त्यानंतर मी तो
सीन दिला. दुसरा एक प्रसंग आहे तो 'शिक्षणाच्या आयचा घो!' या
चित्रपटाच्या शुटिंग दरम्यानचा, भरत जाधव मला कानाखाली देतात आणि मी
चक्कर येऊन खाली पडतो असा हा सीन होता, मला भरतदादांनी एकदा सीन समजावला
आणि मग आम्ही तो सीन सगळा व्यवस्थित केला. अशा अनेक गोष्टी मला शिकता
आल्या. त्यामुळे मी स्वतःला खूप लकी समजतो की अशा लोकांबरोबर मला काम
करता आलं.

* तुझे या क्षेत्रातील प्रेरणा स्थान कोण आहेत?
- मला माझ्या वडिलांनी नेहमीच क्लासिक चित्रपट दाखवले त्यामुळे
चित्रपटविषयक जाण माझ्यात निर्माण झाली. 'व्ही.शांताराम', 'बलराज सहानी',
'गुरुदत्त, नसरूद्दिन शहा’ असे अनेक जेष्ठ कलाकारांच्या कडून मला नेहमी
प्रेरणा मिळत आली आहे.

* चित्रपट, लघुपट, माहितीपट, नाटक, मालिका अशा विविध क्षेत्रात आजवर तू
काम केले आहेस, यातील कोणत्या क्षेत्रात तुला काम करायला आवडेल?

- मला मनापासून नाटकात काम करायला आवडतं. कारण नाटक करतानाच आपल्याला
प्रतिसाद देणार्‍या प्रेक्षकांकडून आपण केलेल्या कामाची पावती मिळत असते.
माझं खरचं नाटकावर मनापासून प्रेम आहे. मला दिग्दर्शन करायची खूप इच्छा
आहे. त्यामुळे या सर्व क्षेत्रात मी मन लावून काम करतो.

* नाटकाकडे तू करिअर ऑप्शन म्हणून पाहतोस का?
- मला फक्त नाटक करायचं आहे असं नाही. मला चित्रपटातही करिअर करायचं आहे.
जसं डॉ. श्रीराम लागू त्यांच्या अनेक चित्रपटांच्या चित्रिकरणात व्यस्त
असायचे. पण नाटकाच्या प्रेमापोटी ते शनिवार आणि रविवार नाटकांचे प्रयोग
करायचे. तशाच प्रकारे मला दोन्हीही करायला आवडेल.

* सध्या तुझे कोणते नवीन प्रोजेक्ट सुरू आहेत.
- संजय जाधव यांनी दिग्दर्शित केलेला 'फक्त लढ म्हणा' या चित्रपटात मी
काम करत आहे. तसचं या चित्रपटाबरोबर 'मिराद- ए बॉय फ्रॉम बोस्निया' हे
इंग्रजी नाटक सध्या मी करत आहे.

* चित्रपटात काम करण्यासाठी रंगभूमीवर आधी काम करण्याची गरज आहे का?
तुला काय वाटतं?

- हो नक्कीच मी या मताशी सहमत आहे. चित्रपटात काम करायच्या आधी मी थिएटर केलं होतं त्याचा मला नक्कीच फायदा झाला. आज प्रत्येक कलाकार थिएटरमध्ये
काम करण्याची अपेक्षा बाळगून असतो. मी 'नाटयसंस्कार कला अकादमीत' होतो
त्यामुळे मला खूप संधी मिळाल्या.

* विनोदी चित्रपटांकडून कलात्मक, गंभीर विषयांच्या निर्मितीकडे मराठी चित्रपट सृष्टीची वाटचाल सुरू झाली आहे. हा बदल या क्षेत्रातील नव्या
पिढीच्या दृष्टीने पूरक आहे का?

- हा बदल नक्कीच चांगला आहे. कारण कृत्रिमतेवर आधारीत चित्रपट मला आवडत
नाहीत. उगाचच हसवायचं म्हणून तयार होणारे चित्रपट मला करायला आवडतं
नाहीत. पण 'पडोसन' सारख्या चित्रपटातील हलके फुलके, सहज घडणारे असे विनोद
मनाला आणि लोकांना जास्त अपील होतात. अशा चित्रपटांची निर्मिती झाली
पाहिजे. वास्तवाचा चेहरा लोकांसमोर आणणारे चित्रपट लोकांना खूप काही
चांगलं दाखवतात. त्यामुळे मला वाटतं की हा बदल झाला हे चांगलंचं आहे.
कारकीर्दीच्या सुरूवातीलाच चांगल्या संधी मिळूनही सक्षम आजही अनेक
प्रयोग तो करत असतो. सक्षमला त्याच्या कारकीर्दीत अनेक चांगल्या भूमिका
साकाराला मिळो, हीच 'मम टीमची' मनोकामना...
- शिल्पा भावे