“ऑन ड्युटी २४ तास”साठी पार्था आकिरकर बरोबर केलेली खास बातचीत

“ऑन ड्युटी २४ तास”साठी पार्था आकिरकर बरोबर केलेली खास बातचीत

पार्था आकिरकर हे नाव जाहिरात क्षेत्रात नवखं नाही. पार्थाने आजपर्यंत अनेक जाहिरातींसाठी लेखन केले आहे , तसेच हिंदी आणि इंग्लिश थिएटरमधूनही त्याने आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. केदार शिंदे दिग्दर्शित “ऑन ड्युटी २४ तास” ह्या आगामी चित्रपटमधून पार्था प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. त्यांच्याशी केलेली ही बातचीत…

१) “ऑन ड्युटी २४ तास” मध्ये काम करण्याची संधी कशी मिळाली?
खरं सांगायचं तर माझा मित्र परिवार खूप मोठा आहे . त्यातीलच एक मनिष आंजर्लेकर नावाच्या मित्र जो ह्या चित्रपटाचा एक भाग आहे त्याने केदार सरांना माझं नाव सुचवलं. केदार सरांनी मला त्यांच्या ऑफिसमध्ये बोलावून घेतले. त्यांना भेटताक्षणी मी त्यांच्या बरोबर काम करण्याची ईच्छा व्यक्त केली. मी “झूम” चॅनलवर एका शो चा विजेता ठरलो होतो मी त्याची शो रिल सरांना दाखवली त्यांनाही माझं काम आवडलं आणि त्यांनी मला ह्या चित्रपटातील भुमिकेविषयी विचारलं. केदार शिंदेंसारख्या दिग्दर्शकाबरोबर काम करायला मिळणार ह्या पेक्षा आणखी काय पाहिजे?

२.) “ऑन ड्युटी २४ तास”मधील भुमिकेविषयी….
या चित्रपटात आम्ही एकूण १५ पोलिस आहोत त्यातील मी “हनुमंत चव्हाण” ही भुमिका साकारतोय . अतिशय भारदस्त व्यक्तिमत्व असलेला हा हवालदार प्रचंड भित्र्या स्वभावाचा आहे. खरंतर त्याला पोलिसांत भरती होण्याची अजिबात ईच्छा नसते पण पालकांच्या हट्टामुळे तो पोलिस दलात भरती होतो. पोलिसांच्या विशेष दलात सहभागी झाल्यावर मात्र आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याची त्याची धडपड सुरू होते. अतिशय विनोदी भुमिका आहे , मला खात्री आहे की ही भुमिका ही रसिक प्रेक्षकांना नक्की आवडेल .

३.) तुमच्या मते “ऑन ड्युटी २४ तास” ह्या सिनेमाचं वेगळेपण कशात आहे?
मला वाटतं की मुळातच आजपर्यंत पोलिसांवर सिनेमा एकही सिनेमा झालेला नाहीये. आजपर्यंत सिनेमांमध्ये पोलिसांना नकारात्मक दाखवलं आहे पण ह्या सिनेमाच्या माध्यमातून पोलिसांमधला “माणूस” दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि हेचं ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल .केदार सरांनी केलेली .गंभीर विषयाची साधी , सोपी आणि उपहासात्मक मांडणी हे देखील ह्या सिनेमाचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो.

४.) केदार शिंदेंबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
केदार सरांबरोबर काम करण्याची माझी खूप ईच्छा होती ती या चित्रपटामुळे पूर्ण झाली. केदार सरांचा कामाचा उत्साह बघून आम्ही सगळेच थक्क व्हायचो. कोणतही काम केदार सर अतिशय झोकून देवून करतात. सर्वांना माहीत आहे की केदार सर एक उत्तम दिग्दर्शक आहेत पण ते अतिशय उत्तम अभिनेते आहेत आणि असं असूनही ते प्रत्येक कलाकाराला आपापलं अभिनय स्वातंत्र्य देतात.यातूनच त्यांचं एक वेगळेपण सिद्ध होतं. मी खरंच खूप भाग्यवान आहे की मला केदारजींनी ह्या चित्रपटात काम करण्याची संधी दिली.

५.) अपकमिंग प्रोजेक्ट्स विषयी…
मी नाना पाटेकरांचा “हॉर्न ओके प्लीज” आणि मधूर भांडारकर यांचा “दिल तो बच्चा है जी” हे दोन सिनेमे करतोय.