अभिनव प्रयोग - फू बाई फू

आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळया माध्यमांनी आपल आयुष्य जोडलं गेलं आहे. घरातल्या दैनंदिन गरजेच्या वस्तूपसून ते आपल्या सगळयांच्या लाडक्या टीव्हीपर्यंत. आपल्या रोजच्या चिंता, ताणतणाव, स्वप्नांचा शोध बरेच जण मालिकांच्या स्वरूपात घेत असतात. यापैकी टीव्हीकडे एक घटकाभर करमणूक म्हणून आपण पाहतो. या करमणूकीत रिअ‍ॅलिटी शोजचं महत्त्व खूप जास्त आहे. रिअ‍ॅलिटी शोजबद्दल बोलायचं झाल्यास सध्या झी मराठीवर सुरू असणारा 'फू बाई फू' हा कार्यक्रम आवडीने पाहिला जातो. आजवर या कार्यक्रमासारखा रिअ‍ॅलिटी शो यापूर्वी दूरचित्रवाहिनीवर प्रक्षेपित झाला नव्हता. याकडे झी मराठीचा एक अभिनव प्रयोग म्हणून पाहता येईल.
या कार्यक्रमातली सगळी मंडळी ही नाटकात काम करणारी आहे. त्यांचं अचूक टायमिंग, विनोदबुध्दी, सहज वावर यामुळे ही सगळी मंडळी लोकप्रिय झाली आहेत. या शोचे दिग्दर्शक राकेश सारंग असून यापूर्वी अनेक यशस्वी मालिकांचं दिग्दर्शन त्यांनी केलं आहे. यामध्ये कलाकारांचे परफॉर्मन्स लिहिणारे लेखक कोण आहेत, याची माहिती प्रेक्षकांना कळते. मात्र या शोची लेखणी ज्यांच्याकडे आहे ते आहेत, विश्वास सोवनी. त्यांनी यापूर्वी झी मराठीच्या रिअ‍ॅलिटी शोसाठी लिखाण केलं आहे. निलेश साबळे आणि सई ताम्हणकर ही दोघं या शोचं सूत्रसंचलन करतात. निलेश तर 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'मधून घराघरांत पोहोचला आहे. याशिवाय शोचं आणखी एक वैशिष्टय म्हणजे या कार्यक्रमाचे परीक्षक निर्मिती सावंत आणि स्वप्नील जोशी. यांच्या कमेंटपेक्षा एक प्रेक्षक म्हणून ते जसा कार्यक्रमाचा आस्वाद घेतात ती रसिकवृत्ती लोकांना आवडते.
आजचा जमाना इन्स्टंट आहे असं नेहमी म्हटल जातं.पूर्वी तीन अंकी नाटक लोक आवडीने पाहायचे. त्यानंतर दोन अंकी आणि आता असे एका तासाचे कार्यक्रम लोकांना आवडतात. विनोदाला मरण नाही त्यामुळे असे अभिनव प्रयोग जोपर्यंत असतील तोवर रसिकप्रेक्षक त्यांची पसंती देतीलच.