उमेश कुलकर्णी
मराठी चित्रपटांचा कायापालट...
सगळ्यात पहिल्यांदा तर मला मराठीमनोरंजनसारखं पोर्टल सुरु झाल्याबद्दल आनंद व्यक्त करायला आवडेल. कारण या पोर्टलमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकांची भूमिका, त्यांचे विचार मांडण्यासाठी एक उत्तम प्लॅटफॉर्म निर्माण झाला आहे. या पोर्टलवरील लिखाण नक्कीच सर्वांसाठीच दिशादर्शक ठरु शकेल असं मला वाटतं.
मराठी चित्रपटसृष्टीत संचारलेला नवा जोश, नवं वारं आपल्या सगळ्यांनाच परिचित झालं आहे. बदलाच्या लाटेची सुरवात तशी साधारणतः सात- आठ वर्षांपूर्वीच झाली होती. आणि हळूहळू तिने घडवलेलं परिवर्तन आज आपण सगळेच अनुभवत आहोत. मराठी प्रेक्षक मराठी चित्रपटांपासून दूर गेला आहे आणि म्हणूनच इंडस्ट्रीला वाईट दिवस आले असं कायम बोललं जायचं...पण मला वाटतं चित्रपटचं असे असायचे की प्रेक्षकांकडे दुसरा पर्याय उरला नव्हता. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर पूर्वीच्या चित्रपटांना प्रेक्षक रिलेट करु शकत नव्हते, रील लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये तफावत असल्याने त्यांची त्या चित्रपटाशी नाळच जुळायची नाही. चित्रपटांचे विषय त्यांच्याशी, त्यांच्या रोजच्या जगण्याशी संबंधित नसायचे. त्यामुळेच प्रेक्षक मराठी चित्रपटांकडे फिरकेनासे झाले.
हळूहळू हे चित्र पालटत गेलं.. फिल्म फेस्टीव्हल्सनी त्यात महत्त्वाची भूमिका बजावली. प्रेक्षकांची, विशेषतः नव्या पिढीची देशोदेशीच्या चित्रपटांशी, तिथल्या चित्रपट संस्कृतीशी ओळख होऊ लागली. पुण्यात असलेलं फिल्म इन्सिट्यूट, ललित कला केंद्रामध्ये शिकणाऱयांची संख्या वाढू लागली. यंग दिग्दर्शकांचा ग्रुप तयार होऊ लागला. फिल्म फेस्टीव्हलप्रमाणेच विदेशी चित्रपटांच्या डीव्हीडी सहज उपलब्ध होऊ लागल्यानेही नवा दृष्टीकोन मिळायला मदत झाली. मल्टीप्लेक्स कल्चरने तर अत्यंत मोलाची भूमिका बजावली. कारण मल्टी स्क्रीन्समुळे नेहमीपेक्षा वेगळं काहीतरी बघायची संधी उपलब्ध झाली. माझ्या पिढीला ऑफ बीट मूव्हीजचं क्षेत्र त्यामुळेच खुलं झालं. आणि मग त्याची परिणीती उत्तम विषय असलेल्या चित्रपटांची निर्मिती करण्यात होऊ लागली. हां...अर्थात पूर्वी सुद्धा वेगळे विषय असलेले चित्रपट येत होतेच. किंबहुना जेव्हा मनोरंजन हा एकमेव हेतू डोळ्यासमोर ठेवून चित्रपट केले जायचे, ज्यात काहीच नाविन्य नसायचं तेव्हाही काही दिग्दर्शकांनी वेगळेपणाची परंपरा जपली. सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, जब्बार पटेल, नचिकेत.... पटवर्धन, अमोल पालेकर यांसारख्या दिग्गजांनी कायमच आपल्या चित्रपटांतून नवं काहीतरी देण्याचा, सांगण्याचा प्रयत्न केला.
आता जरी नवा सुवर्णकाळ मराठी चित्रपटसृष्टीला पहायला मिळत असला तरी तो तसाच चिरंतन राहण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. कारण वेगळ्या फिल्म्स तयार करणं, त्या प्रेक्षकांपर्यंत पोचवणं ही एक मोठी प्रोसेस आहे. जी चेरिश होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण, वेगळ्या विषयावर आधारित फिल्म्स तयार होणं सुरु झालं असलं तरी प्रेक्षकांना त्या बघण्याची, समजून घेण्याची सवय लागणं गरजेचं आहे. तशी सवय लागली तरच अशा फिल्म्स टिकून राहतील. वळू करताना माझा अनुभव असाच काहीसा होता. ज्या चित्रपटाचा हिरो बैल आहे तो चित्रपट कसा काय चालेल असं सगळ्यांचंच म्हणणं होतं. पण मला वाटायचं, मी जे मनापासून करतो आहे, जे आमच्या टीमला आवडलं आहे, पटलं आहे, ते प्रेक्षकांनाही नक्कीच पसंत पडेल. आणि झालंही तसंच...वळूमुळे मराठी चित्रपटाला सिरियसली घेतल्याचं मत मला अनेक तरुणांकडून एकायला मिळालं. जे नंतर हळूहळू मराठी चित्रपटांकडे वळले. हा प्रेक्षकवर्ग खूपच सॅव्ही आहे, ते रिअलॅटी बेस्ड मू्व्हीजचं कौतुक करतात. जसं त्यांना धरुन ठेवणं आम्हाला महत्त्वाचं आहे तसंच मला वाटतं प्रेक्षकांनीही अशा चित्रपटांची निर्मिती होत राहण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. त्यांनीही सजग रहायला पाहिजे, चांगल्या चित्रपटांसाठी चर्चेद्वारे वेलकमिंग वातावरण तयार केलं पाहिजे.
सध्याच्या वातावरणात घडलेली आणखी एक गोष्ट मला खूपच एनकरेजिंग वाटते...ती म्हणजे कॉर्पोरेट्सचा मराठी चित्रपटांना मिळत असलेला पाठिंबा..माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर विहीरला एबी कॉर्पने दिलेला पाठिंबा आणि क्रिएटीव्ह फ्रीडम खूपच हेल्पिंग होतं. आणि सध्या त्याबद्दल सर्वांना वाटत असलेली उत्सुकता, विहीरचं बर्लिनच्या फिल्म फेस्टीव्हलसाठी झालेलं सिलेक्शन मराठी सिनेमाच्या रिव्हायव्हल प्रक्रियेतील मोठा टप्पा ठरेल असा मला ठामपणे वाटतं.
लूकिंग फॉर्वड, मला अशी आशा वाटते की मराठी मनोरंजनद्वारे वन टू वन चर्चा होण्यास मदत होईल., माझी रसिकांना, प्रेक्षकांनाही विनंती आहे की त्यांनीही या पोर्टलकडे मराठी चित्रपटसृष्टीतील एक दिशादर्शक चळवळ म्हणूनच पहायला हवं आणि त्यात सामील व्हायला हवं.
[शब्दांकन - मराठी मनोरंजन टीम]
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
मम ब्लॉग
आपल्या समाजात बोकाळलेला बेशिस्तपणा सध्या मला खूप त्रास देतो आहे. ज्यामध्ये सिग्नल सुरू
आजचा वाढदिवस

