प्रसाद ओक
नवे चेहरे...
हल्ली खूपदा सेटवर गेलं की मला अचानक अनोळखी फिलिंग येते… कधीकधी तर सहकलाकारांबरोबर सीन करताना तर चक्क अस्वस्थही वाटतं!! खरं तर सेटवर रोजचीच माणसं असतात, परिचयाच्या वस्तू दिसत असतात. पण तरीही मला ही फिलिंग येत असते...बरेच दिवस त्यामागचं कारणही लक्षात येत नव्हतं. एक दिवस मात्र या भावनेमागचे कारण लक्षात आलं... सेटवर दर दिवशी दिसणारे नवे चेहरे मला अस्वस्थ करत होते. यात अस्वस्थ होण्यासाखं काय असा प्रश्न तुमच्या मनात आला असेल... पण हे खरं आहे. कारण, सेटवर वावरणारया कलाकारांमध्ये दर काही दिवसांनी नवे चेहरे दिसतात आणि पुढच्या काही दिवसांत ते गायबही होतात. चांगला अभिनय हे त्यांचं ध्येय नसतंच. केवळ एक टाईमपास म्हणून ते आलेले असतात.
अभिनय करायच्या कल्पनेनं ही नवीन मुलं- मुली झपाटलेली नसतात. त्यांच्यातले बहुतेक जण हौस बहुतांशवेळा टाईमपास करण्याच्या हेतूने सिरीयल्स- चित्रपटांकडे वळलेले असतात. मग काहीच दिवसांत त्यांच्या आणि निर्मात्याच्या लक्षात येतं की याच्यात काही दम नाही. टॅलेट तर औषधालाही नाही. मग, ते हे क्षेत्र चक्क सोडून जातात. मग त्यांच्या जागी परत दुसर्या कलाकाराचा शोध घ्यावा लागतो, त्यांच्याशी इतर कलाकारांचं ट्यूनिंग जमावं लागतं...प्रेक्षकांशी त्यांची नाळ जुळावी लागते...आणि या सगळ्या घोळात कला राहते बाजूला.
त्यांच्याकडे बघताना मला कायम माझ्या करियरची सुरवात आठवते. या क्षेत्रात येण्यापासून ते स्थिरावण्यापर्यंत प्रत्येक पायरीवर मला स्ट्रगल करावा लागला होता. घरच्यांची मनं वळवावी लागली होती, कसोटीच्या क्षणी मित्र- मैत्रिणींचा पाठिंबा मिळवावा लागला होता. असं सगळं अविरतपणे करत राहिल्यानंतर कुठे आजचे दिवस दिसले आहेत. तुम्हाला वाटेल की नव्या दमाच्या कलाकारांना मिळणारं सहज यश मला जेलस बनवतंय की काय..? पण नाही, मी पण एकेकाळी नवीनच होतो की.. त्यामुळे उलट नव्या दमाच्या टॅलेंटला मिळणारा वाव नक्कीच एक चांगलं चिन्ह आहे. पण, अगदी खरं सांगायचं झालं तर मला नवे चेहरे नाही तर त्या चेहर्यांमागचा केअरफ्री अटीट्यूड खटकत असतो. या क्षेत्राचं ग्लॅमर पाहून त्यात येणारया यंग जनरेशनचं प्रमाण वेगाने वाढलं आहे. विशेष म्हणजे, यातले बरेचसे जण टाईमपास म्हणून येत असतात... “चला बघूयात जमतं का? काही नाही तर किमान प्रसिद्धी, थोडा फार पैसा तरी मिळेल ” अशी बेफिकीरी वृत्ती त्यांच्यात असते. त्यांच्यासाठी हे करियर गरज नसते तर ती गाजराची पुंगी असते..वाजली तर ठीक नाहीतर नाही...
मी किंवा माझ्याबरोबर चित्रपट दुनियेत आलेल्या अनेक सहकलाकारांना या क्षेत्रात येण्यासाठी प्रचंड स्ट्रगल करावा लागला होता तोही विशेषकरुन घरच्याच पातळीवर.. आता चित्र नेमकं उलट झालंय... आई वडिलच आपल्या मुलांनी या क्षेत्रात जावं यासाठी आग्रही असतात. इथे आल्यानंतर मिळणारी प्रसिद्धी, मिडीया अटेंशन, समाजात मिळणारं ग्लॅमरस वलय हे सगळं हवंहवंसं असतं... कलेची ओढ त्यांना नसतेच. बर्यापैकी चेहरा असलेले अनेक जण दर दिवशी इंडस्ट्रीत दाखल होत असतात. आजच्या युगात त्यांना ऑप्शन्सही खूप मिळतात. कारण चॅनेल्स आणि त्यावरच्या सिरीयल्सची संख्या वाढली आहे. त्यामुळे नव्या फ्रेश चेहर्यांची गरज भासतेच. जाहिरातीचं क्षेत्रही त्यांना खुलं झालेलं आहे. त्यामुळे पूर्वी जिथे फक्त खणखणीत टॅलेंटला जागा असायची आता तिथे फक्त चेहर्यावर काम होतं. शिवाय या सर्वांबाबतची मला सगळ्यात जास्त खटकणारी बाब म्हणजे, अभिनयाकडे ते कला म्हणून बघत नाहीत. निरीक्षण करणं त्यांच्या स्वभावातच नसतं. अभिनय कसदार व्हावा म्हणून वाचन करण्याची, कॅरेक्टरचा अभ्यास करण्याची वृत्ती त्यांच्यात नसते. मी जरा अतिच टीका करतोय नव्या पिढीवर असं तुम्हाला वाटतं असेलं ना... मला कबुल आहे की सगळेच नवे कलाकार असे नसतात. पण मी म्हणेन अशा फुलपाखरी वृत्तीच्या एक्टर्समुळे जे खरंच डिझर्व्हिंग असतात, त्यांनाच कित्येकदा संधी मिळत नाही आणि ते मागे पडतात. एक कलाकार म्हणून या सगळ्याच गोष्टींचा मला खरंच खूप खेद वाटतो.. मराठी इंडस्ट्रीत येऊ पाहणार्यांना माझी विनंती आहे की प्लीज या कलेकडे टाईमपास म्हणून पाहू नका..या कलेवर प्रेम करायची, तिची सेवा करायची असेल तरच इथे या... नसेल शक्य तर प्लीज एका चांगल्या कलाकाराची जागा अडवू नका....
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
मम ब्लॉग
आपल्या समाजात बोकाळलेला बेशिस्तपणा सध्या मला खूप त्रास देतो आहे. ज्यामध्ये सिग्नल सुरू
आजचा वाढदिवस

