मृणाल कुलकर्णी

Image: 

मराठी मनोरंजनच्या सर्व वाचकांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा! ही दिवाळी तुम्हाला सुखाची, समाधानाची आणि समृध्दीची जावो.
गेल्या काही वर्षापासून मी पी.एन.गाडगीळांसोबत काम करते आहे. यावर्षी 'स्वराज्य' या नवीन कलेक्शनचं मी काम केलं. या कामाचा मला तुमच्याकडून खूपच चांगला प्रतिसाद मिळाला. माझ्या लूकबरोबर दागिन्यांच्या सुंदरपणाचं तुम्ही भरभरून कौतुक केलं त्याबद्दल तुमचे सगळयांचे मनापासून आभार. आपल्या दागिन्यांच्या परंपरेविषयी मी पी.एन.जीचे सौरभ गाडगीळ यांच्याशी संवाद साधला. आमच्या बोलण्यातून मला जाणवलं की आज लोकांमध्ये महाराष्ट्रीयन दागिन्यांविषयी कुतूहल वाढतं आहे. आणि त्याचाच परिणाम म्हणून या कलेक्शनला खूपच चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जाहिरतीमधले माझे दागिने पाहून माझ्या मित्र-मैत्रिणींनी आणि तुमच्यापैकी अनेकांनी हे दागिने खरेदी केले. दागिन्यांचा दर्जा, त्यांची ऐट, त्यांचा विशेष पारंपारिकपणा याचा सर्व विचार करून त्यात थोडा बदल करून 'स्वराज्य कलेक्शनमध्ये' दागिने तयार करण्यात आले आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडतील. आपल्या महाराष्ट्रात भरभरून दागिने घालण्याची पध्दत आहे. मला मात्र एकच छान, नाजूक दागिना घालायला आवडतो.
माझं आणि दागिन्यांचं नातं फार पूर्वीपासून आहे. वयाच्या १६ व्या वर्षी मी दूरदर्शनसाठी 'स्वामी' ही मालिका केली होती. त्या मालिकेत मी रमाबाई पेशवेंची भूमिका केली होती. या मालिकेसाठी खास बाबासाहेब पुरंदरेंनी त्यांच्या घरातले सोन्याचे दागिने आणि पैठणी मला दिली होती. त्या दागिन्यांच्या ओझ्याने मी वाकून जायचे. या मालिकेनंतर मी मीरेच्या जीवनावर आधारित 'मीराबाई' ही मालिका केली होती. यात मी अनेक वेगवेगळया प्रकारचे दागिने वापरले होते. तसंच माझ्या 'द्रौपदी'मालिकेत महाभारतकालीन दागिने वापरण्याची संधी मला मिळाली. 'राजा शिवछत्रपती' या मालिकेसाठी जिजाऊच्या भूमिकेसाठी खास त्या काळातले दागिने घडवून घेतले होते. आणि निश्चितच त्यामुळे ही मालिका त्या काळातली वाट्ली. पी.एन.जीचं आणि माझं नातं असं घट्ट आहे. माझ्या भूमिकांशी असलेलं माझं नातं दागिन्यांनी अधिक घट्ट केलं आहे.
हे झालं दागिन्यांविष्यी आता माझ्या कारकीर्दीतल्या एका नवीन घटनेविषयी माझा 'आरोही' नावाचा नवा चित्रपट येतो आहे. त्याचं चित्रिकरण नुकतचं संपल असून या चित्रपटात किरण करमरकर माझ्या पतीच्या भूमिकेत आहे. तर केतकी माटेगावंकर जी 'सारेगमप'च्या लिटील चॅम्पमध्ये सहभागी झाली होती, अशी छोटीशी गोड गायिका आहे. या चित्रपटामुळे लोकांचा रिअ‍ॅलिटी शोकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेलं, असं मला वाटतं. एका सुखवस्तू कुटूंबातली मुलगी एका रिअ‍ॅलिटी शोमध्ये भाग घेते आणि त्या परिवारचं आयुष्य कसं बदलून जातं, हे सांगणारी ही कथा आहे. या चित्रपटाची कथा तर मी तुम्हाला सांगितली आहे अर्थात या चित्रपटाचं नाव अजून नक्की झालं नाहीये. या चित्रपटासाठी अधिक चांगल नावं आम्ही शोधतोय तुम्हाला एखादं छान, आकर्षक नाव सुचलं तर अवश्य कळवा.
पण तरीदेखील या दोन दिवाळीच्या भेटी खास तुमच्यासाठी. याशिवाय अजून तुमच्याशी बर्‍याच गप्पा मारायच्या आहेत. खूप विषयांवर बोलायचं आहे पण त्यासाठी पुन्हा केव्हातरी .......