विभावरी देशपांडे

Image: 

का गं तुझे डोळे ओले??
माझ्या आय टच शी खेळत होते. इतक्या पसार्यतून् काहीतरी एक निवडायचं आणि ऐकायचं. त्या क्षणी जे वाटेल ते.... अचानक दिसलं 'जो तुम तोडो पिया मै नाही तोडू' 'सिलसिला मधलं नाही, जुनं,,झनक झनक पायल बाजे'!..लता दीदींचा तो स्वर्गीय स्वर, वसंत देसाईंच अद्भुत संगीत....ऐकता ऐकता एक ओळ आली ' तुम मेरे ठाकूर, मै तेरी दासी' ..आणि मी थबकले. तंद्री मोडली..कधीकधी एखादा शब्द, एखादं सहज म्हणून केलेलं विधान एक भलतीच विचारधारा सुरु करून जातं. विनाकारण, संदर्भहीन..'मी तुझी दासी. ...टोकाचं समर्पण आहे हे...स्वतःला विसरून कुणाच्या तरी स्वाधीन व्हायचं. मीराबाईच करू जाणो!! आणि समोर कृष्ण होता!! भलता सलता नाही कुणी! आम्ही समर्पण करायला तसाच कुणी समोर नको?? इत्यादी इत्यादी,,अनेक समर्थन हजर होती. पण काही स्वर, शब्द इतके शुद्ध, पवित्र असतात ना, की आत खोलवर डोकावून पाहावंसं वाटतच. आतली बंद करून, कडी कुलुपात ठेवलेली तार छेडली जातेच. आपण स्वतः लखलखीत उभे रहातो आरश्यासमोर. आणि स्वतःला प्रश्न विचारतो असंख्य. ती उत्तरं मग सोसत नाहीत आपली आपल्यालाच! सगळी समर्थन खोटी, उपरी वाटू लागतात. आपला खोटा चेहरा आपल्यालाच वेडावून दाखवतो. आणि विचारतो ' कृष्ण आला समोर तरी असं समर्पण झेपेल का तुला? इतकी निरागसता आहे शिल्लक आत?' मग आपण सांगतो ठणकावून, 'मुळात का करायचा समर्पण? पुरुष करतो का कधी? स्त्रीनीच करायचा होय? निरपेक्ष राहून भक्ती, सेवा? आणि पुन्हा अग्निपरीक्षा द्यायची सीतेसारखी..का??'
हे सगळं करून झाला माझं. अ मनाचं ब मनाशी भांडण वगैरे! मग वाटलं, ' का सतत झेंडा घेऊन फिरतो आपण? विचारांचा, तत्वांचा, स्वत्वाचा, स्वाभिमानाचा, स्त्रीत्वाचा! का? हे सगळं सोडून लहान मुलाच्या निरागस दृष्टीनी जग पाहताच येऊ नये? समर्पित होताच येऊ नये कधीच? त्यासाठी कृष्ण कशाला हवा? ती भावना जगता येते का मला? असे समर्पणाचे क्षण येतात, नाही असा नाही. पण आपण जगतो ते मनाचे डोळे उघडे ठेऊन? समुद्रकिनारी एकट्यानी उभं राहिलं की मिळतो तो क्षण. कुमार गंधर्वांचे स्वर नेतात तिथपर्यंत. स्वच्छ सूर्योदय मागतो ते समर्पण. एखादं लहान मूल त्याच्या वाटणीचं चिकट चॉकलेट आपल्या तोंडात कोंबत तेव्हा लक्ख, शुद्ध काहीतरी होतं आत, आणि डोळे भरून येतात. आजूबाजूच्या कुणाला, अगदी आपल्या जवळच्यांनापण् कळत नाही काहीच. मग तो प्रश्न ' काय गं, काय झालं अचानक? मग आपण सावरतो, आपले सगळे बुरखे भराभर ओढून घेतो. जणू काही झालंच नाही असे वावरू लागतो. जगरहाटी आहे हो! पर्याय नाही! तिला समर्पित होणे आवश्यकच! पण ते आतलं मूल् विचारात राहतं, ' का ग तुझे डोळे ओले? '