श्रीरंग गोडबोले

Image: 

पायरसी

काही दिवसांपूर्वी कामानिमित्ताने कोथरुडमधल्या एका परिचितांच्या घरी गेलो होतो...गप्पांच्या ओघात विषय निघाला तो मराठी चित्रपटांना मिळत असलेल्या यशाचा... ते गृहस्थ सर्वच नव्या चित्रपटांबद्दल अगदी भरभरुन बोलत होते. विशेष म्हणजे नव्याने आलेल्या सगळ्याच चित्रपटांवर म्हणजे अगदी हरिशचंद्राची फॅक्टरीपासून झेंडा, नटरंगपर्यंत सर्वांवर ते हिरीरीने आपली मते मांडत होते. त्यांनी हे सगळेच पिक्चर्स पाहिल्याचे अर्थातच त्यांच्या बोलण्यातून सहज कळत होतं....

नेमकी हीच बाब मला सुखावत होती. त्यांच्याप्रमाणे सगळ्यांनीच मराठी चित्रपट पहायला उत्सुकता दाखवली तर इंडस्ट्रीचा रेव्हेन्यू कितीतरी पटींनी वाढेल असंही वाटून गेलं. पण पुढच्या दोनच मिनिटांत त्यांनी मला स्वप्नरंजनातून जागं केलं. ते जिथे राहतात त्या कॉलनीमध्ये एक ग्रुप बनवला आहे ज्यातील प्रत्येकजण मराठी चित्रपटांच्या पायरेटेड डीव्हीडी विकत आणतो आणि मग त्या इतरांबरोर एक्सचेंज केल्या जातात. अशाचप्रकारे त्यांचे सगळे पिक्चर्स आरामात पन्नास साठ रुपयांत घरबसल्या पाहून होतात. पायरेटेड डीव्हीडीची पाळमुळं सुशिक्षित वर्गापर्यंतही अगदी खोलवर रुजली आहेत हा माझ्यासाठी नाही म्हटलं तरी धक्का होता. एक निर्माता या नात्याने मला या प्रकाराचं खूपच वाईट वाटलं...

एकेकाळी मराठी चित्रपटांचा काळ खरंच सुवर्णकाळ होता... प्रेक्षक हौसेने थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहायचे...नंतर 90 च्या दशकांत मात्र मराठी सिनेमाला घरघर लागली...तेव्हाची स्थिती तर इतकी वाईट होती की वर्षाकाठी केवळ सात- आठ चित्रपट निघायचे....2005 पर्यंत ही स्थिती कायम राहिली.. त्यानंतर मात्र श्वास चित्रपटाने परिस्थिती बदलवली.. त्याच काळात मल्टीप्लेक्सचाही उदय झाला. मग डोबिंवली फास्ट, वळू यांसारखे चांगले चित्रपट येऊ लागले...या चित्रपटांनी भविष्यातल्या सोनेरी दिवसांची जणू नांदीच दिली...ही परंपरा आजच्या नटरंग, शिक्षणाच्या.., झेंडा, विहीरपरर्यंत सुरुच राहिली आहे. चित्रपटांचे विषय आजच्या काळाशी सुसंगत झाल्याने प्रत्येक वयोगटातला सुशिक्षित प्रेक्षक आवडीने मराठी चित्रपटांकडे वळाला. उच्च दर्जाची निर्मिती होऊ लागली, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ लागला. त्याची परिणीती यशात नसती झाली तर नवलच....शिवाजी राजेनं तर रेकॉर्ड ब्रेक कलेक्शन केलं...तब्बल 22 कोटींचे कलेक्शन या चित्रपटाच्या नावावर जमा झाले. अशाप्रकारे मराठी चित्रपट एकापाठोपाठ एक यशस्वी होत गेले आणि आजवर लपलेल्या पायरसी नावाच्या राक्षसानं आपलं डोकं वर काढलं. खूप झपाट्यानं या राक्षसाचा विळखाच आपल्या चित्रपटसृष्टीभोवती पडला. आज कोपऱया- कोपऱयावर चित्रपटांच्या डीव्हीडी मिळतात. धक्कादायक बाब म्हणजे काही चित्रपटांच्या डीव्हीडी तर तो रिलीज होण्याआधीच पायरसी मार्केटमध्ये आलेल्या असतात. उदा. झेंडाच्या डीव्हीडी रिलीज आधीच मार्केटमध्ये उपलब्ध होत्या....हे खूप भयंकर आहे इंडस्ट्रीसाठी, इट इज सिरीयसली किलिंग मराठी इंडस्ट्री...कारण जेव्हा चित्रपट रिलीज होतो किंवा होणार असतो..तेव्हा अर्थातच प्रेक्षकांमध्ये त्याबद्दल उत्सुकता असते..अशावेळेस त्या चित्रपटाची डीव्हीडी मिळाली तर साहजिकच चार जणं ती पाहणार...मग हा ऑडियन्स मल्टीप्लेक्सपर्यंत जातच नाही. यामुळे गेल्या काही महिन्यात माझ्यासह अनेक निर्मात्यांचं प्रचंड नुकसान झालंय.. पायरेटेड डीव्हीडी घेण्यामागे त्याची सहज परवडणारी किंमत हा मुद्दा असतोच. पण चित्रपटाच्या तिकिटविक्रीतून जे पैसे उभे रहात असतात त्यावर पुढील चित्रपटाची निर्मितीमूल्ये अवलंबून असतात हे साधं सोपं गणित प्रेक्षकांनी जाणायला हवं. त्यामुळे सुमार दर्जाच्या निर्मितीला जे सुजाण प्रेक्षक नावं ठेवतात आणि तेच पायरेटेड डीव्हीडी विकत घेतात ही बाब खरच हर्ट होते.

याबाबतीत मला दक्षिणेकडच्या प्रेक्षकांचे खरंच कौतुक वाटतं. तिथल्या सुपर्सस्टारचे फॅन क्लब पायरसी रोखण्याचं मोलाचं काम अगदी जबाबदारीनं पार पडत असतात. उदा. जेव्हा रजनीकांतच्या नव्या चित्रपटाच्या पायरेटेड डीव्हीडी विकताना आढळल्यास फॅन क्लबचे मेंबर त्या डीव्हीडीज् चक्क तोडून टाकतात. इतकंच नव्हे तर त्या विकणाऱयाला आणि विकत घेणाऱयाला बदडायलाही कमी करत नाहीत. एकप्रकारे ते आपला सिनेमा प्रोटेक्ट करतात.
त्यामुळे माझी प्रेक्षकांना कळकळीची विनंती आहे की प्लीज पायरेटेड डीव्हीडी विकत घेऊन आपल्या मराठी इंडस्ट्रीला तोट्यात आणू नका. थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पहा. जेणेकरुन उत्तमोत्तम दर्जाच्या चित्रपटांची सातत्याने निर्मिती होत राहिल.