सलील कुलकर्णी
...आणि आभाळ भरुन जातं
काही दिवसांपूर्वीचाच प्रसंग..पुणे मुंबई एक्सप्रेसवे वरुन प्रवास करत होतो. एसी लावलेल्या बंद गाडीच्या काचांमधून बाहेर पहात बसायचा कंटाळा आला होता. म्हणून मग काचा उघडल्या....आणि वार्याची गार झुळुक लगेचच आत आली... उन्हं उतरल्यानं बाहेरच्या वातावरण सुखद वाटू लागलं होतं...गाडीच्या वेगाबरोबरच रस्त्याच्या कडेची झाडं, विजेचे खांबही पळत होते....अगदी दूरवर दिसणाऱया वीजेच्या तारांवर एक सुंदर पक्षी बसलेला मला दिसला... उन्हाची तिरीप त्याच्या मखमली पंखावर पडत असल्याने त्यावरचे रंगही चमकत होते....तेवढ्यात आणखी एक-दोन तसेच पक्षी त्याच्या शेजारी येऊन बसले....मग आणखीन वेगळेच कुठलेसे पक्षीही त्यांना सामील झाले...तारांवर पक्ष्यांची मैफल भरल्यासारखं दिसू लागलं...गाडी तिथपर्यंत जाईस्तोवर त्या तारा पक्ष्यांनी भरुन गेल्या....खूप साधं पण फारच सुंदर दृश्य होतं ते....ते पक्षी दिसेनासे होईपर्यंत मी त्यांच्याकडे पहात राहिलो.... नकळत सुधीर मोघे यांच्या कवितेतल्या ओळी आठवल्या..... “ कुठून कुठून येतात पक्षी, आणि आभाळ भरुन जातं ”.
वाटलं, आपलं पण असचं काहीसं होतं का ? म्हणजे, आधी आपण एकटेच असतो, स्वानंदातून आपण संगीताची निर्मिती करतो...आणि बाकी सगळे जण त्याला कधी जोडले जातात कळत सुद्धा नाही...अगदी कार्यक्रमाचा सेट सज्ज करणाऱया बॅक स्टेज हेल्पर पासून ते भरभरून दाद देणाऱया रसिकापर्यंत सगळे आपल्या निर्मितीशी एखादं नातं असावं तसे जोडले जातात. मघाचाच एक प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. मैफल एन रंगात असताना बॅक स्टेजमधला एक हेल्पर विंगेतच उभा राहून अगदी तल्लीन होऊन गाणं एकत होता...कौतुकमिश्रित समाधानाचे भाव त्याच्या चेहऱयावर होते. छान वाटलं एकदम!!
काही वेळापूर्वी प्रवासात चहा घेण्यासाठी थांबलो असताना एका रसिकाने ज्यांचं वय किमान सत्तरीच्या घरात असावं त्यानी अगदी अदबीनं नमस्कार केला होता मला...तेव्हा जितकं समाधान वाटलं तितकंच समाधान विंगेत उभं राहून गाणं एकणार्या त्या रसिकानं मला दिलं... संगीतामध्ये, शब्दांमध्ये कोणाच्याही हृदयापर्यंत पोचण्याची जी ताकद असते तिचा परत एक अनुभव मला या दोनही प्रसंगांनी दिला...खरं तर माझी संगीत निर्मिती खूपदा स्वान्त सुखायच असते..कारण मला वाटतं तुम्ही एखादी र्निर्मिती करताना जितके वैयक्तिक होता तितकी ती कलाकृती वैश्विक होते. कारण, निर्मिती करताना स्वत-ला मनापासून आनंद मिळाला तर तो इतरांपर्यंत नक्की पोचतो. मग तो आनंद अग्गोबाई गातानाचा असो किंवा संधीप्रकाश......गातानाचा असो... शब्द, सूर, संगीत यांचा मनापासून घातलेला मेळ कोणत्याही वयाच्या व्यक्तीपर्यंत हृदयाला अगदी सहज भिडतो. आणि त्यांची मनं माझ्या एखाद्या कलाकृतीला जोडली जाणं माझ्यासाठी सगळ्यात मोठी देणगी असते. पैसा, मान-सन्मान, पुरस्कार, यश या सगळ्यापेक्षा तेच मला जास्त मोलाचं असतं. मनाच्या जास्त जवळ असतं.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
मम ब्लॉग
आपल्या समाजात बोकाळलेला बेशिस्तपणा सध्या मला खूप त्रास देतो आहे. ज्यामध्ये सिग्नल सुरू
आजचा वाढदिवस

