सुबक अविष्कार' - हर्बेरियम उपक्रम

Image: 

मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ अनुभवण्यासाठी सुनील बर्वेनी स्वत:च्या 'सुबक' संस्थेतर्फे 'हर्बेरियम' उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. या उपक्रमात रंगभूमीवरच्या उत्तम कलाकृतीचा आस्वाद रसिकांना पुन्हा घेता येणार आहे. चांगल्या नाटकाचे प्रयोग रसिकांना पाहायला मिळावेत हा या उपक्रमाचा हेतू आहे. मराठी चित्रपट, मालिका ,रंगभूमी अशा सर्वच माध्यमांमध्ये सुनील बर्वे हे आजचं आघाडीचं नाव. आजवर आपण त्याला अनेक भूमिकांमध्ये पाहिलं. आता हा कलाकार निर्मात्याच्या नव्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतो आहे.
प्रत्येक कलाकाराची रंगभूमीवर काम करण्याची इच्छा असते. मात्र चित्रपट, मालिका यामध्ये व्यस्त असताना रंगभूमीसाठी फार वेळ देता येत नाही. हा विचार करूनच सुनील बर्वेनी एक कल्पना मांडली आणि ती कलाकार, दिग्दर्शकांनी उचलून धरली. कलाकाराच्यां व्यस्ततेमुळं अनेकदा नाटकाचे प्रयोग कसे करावेत हा प्रश्न निर्मात्यांपुढे असतो. या उपक्रमात हा प्रश्न देखील निकालात काढण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक नाटकाचे २५ प्रयोग होणार आहेत. बर्‍याचदा कलाकारांना चांगल्या नाटकांत काम करण्याची संधी मिळते मात्र कामाच्या व्यस्ततेमुळे अशा संधी मिळ्तीलच असे नाही, ही अडचण या उपक्रमाव्दारे दूर होऊ शकते. या उपक्रमासाठी पाच अशी नाटकं अशी निवडली जाणार आहेत की त्यासाठी उत्तम दिग्दर्शक, कलाकार आणि लेखक मंडळी काम करणार आहेत. त्यात प्रतिमा कुलकर्णी, मंगेश कदम, विजय केंकरे, गिरीश जोशी, चंद्रकांत कुलकर्णी यांचा समावेश असणार आहे. यातील १३ प्रयोग मुंबईत तर १२ प्रयोग उर्वरित महाराष्ट्रात होणार आहेत. 'हर्बेरियम'मधलं पहिलं नाटक होतं, 'सूर्याची पिल्ले' या नाटकाला रसिकांनी 'हाऊसफुल्ल' प्रतिसाद दिला. वसंत कानेटकरांच्या सहज सोप्या भाषेतल्या या नाटकाला नवीन तरूण पिढीनं तेवढयाच ताकदीनं साकारलं. 'सूर्याची पिल्ले' च्या नवीन प्रयोगात आनंद इंगळे, वैभव मांगले, अनिकेत विश्वासराव, अतिशा नाईक, क्षिती जोग, उज्ज्वला जोग हे कलाकार होते. तर या नाटकाचं दिग्दर्शन प्रतिमा कुलकर्णी यांनी केलं होतं.
या उपक्रमातलं दुसरं नाटक ४० वर्षापूर्वी रंगभूमीवर आलेलं, मराठी रंगभूमीवर इतिहास घडवणार्‍या बाळ कोल्हटकरांचं 'लहानपण देगा देवा' हे असणार आहे. या नाटकांच दिग्दर्शन मंगेश कदम करणार असून त्यात शरद पोंक्षे प्रमुख भूमिका करणार आहेत. सुनील बर्वेच्या या उपक्रमामुळे नव्या पिढीला मराठी रंगभूमीचा समृध्द वारसा कळू शकेल यात शंका नाही.