सुबोध भावे
कट्यारच्या निमित्तानं...
मला वाटतं कलाकाराची खरी गरज असते ती क्रिएटीव्ह सॅटीसफॅक्शन मिळवणे... रोजच्या कामातून ते मिळवण्याचा आम्ही प्रयत्न करतो खरा... पण तो यशस्वी होतोच असं नाही... कित्येकदा तर चित्रपट, मालिका, जाहिरातींच शूटिंग, इतर कार्यक्रम यांच्यातून वेगळा काही करायचा विचार करायला सुद्धा वेळ मिळत नाही... पण अशा वेळेस जर आव्हानात्मक संधी मिळाली तेव्हा ती सोडणं शक्यच नसतं... कट्यार काळजात घुसली हे तमाम मराठी रसिकांच्या मनात ठसलेलं संगीत नाटक परत रंगभूमीवर आणणे हे सुद्धा असचं एक आव्हान होतं. जे केवळ तीनच महिन्यांपूर्वी माझ्यासमोर उभं राहिलं होतं.. आणि सध्या त्याला रसिकांचा जो प्रतिसाद लाभतोय तो पाहून एक कलाकार आणि एक दिग्दर्शक म्हणून आपला प्रयत्न सफल झाल्याचं समाधान मिळतं आहे.
एकेकाळी संगीत नाटकांना समाजात अगदी उच्च स्थान होतं. रसिकांसाठी तो अमूल्य आनंदाचा ठेवा होता. आपल्या घरातल्या वयस्कर आजी- आजोबांच्या चेहर्यावर संगीत नाटक म्हटलं की हमखास हसू उमटतं. पण काळ बदलत गेला तशी ही नाटकं मागे पडत गेली. मग प्रेक्षक त्याच्याकडे फिरकेनासे झाले...मी स्वत- शास्त्रीय संगीताचा निस्सीम चाहता आहे. माझे काही खास मित्र शास्त्रीय गायक आहेत. माझ्याप्रमाणेच शास्त्रीय संगीतवर प्रेम करणारी हजारो जण आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ती प्रत्येक वयोगटात आहेत. मग तरी का संगीत नाटकांना प्रेक्षक लाभत नाही असा प्रश्न माझ्या मनात पिंगा घालत होता. तेव्हा विचार केल्यावर लक्षात आलं की काळानुसार प्रत्येक गोष्टीत बदल घडवावेच लागतात. कोणतीही गोष्ट काळाशी सुसंगत होते तेव्हा ती स्वीकारली जाते. हा जगाचा नियमच आहे म्हणा ना.. त्यामुळे जेव्हा कट्यार परत रंगभूमीवर आणायचं ठरवलं तेव्हा पहिलं काही ठरवलं असेल तर ते हेच की कट्यारच्या संहितेत एका शब्दाचाही बदल करायचा नाही पण ते आजच्या युगाबरोबर चालणार्या प्रत्येक रसिकाला आपलंसं वाटलं पाहिजे... त्यामुळेच एकेकाळी तासंनतास चालणार्या संगीत नाटकांची लांबी आम्ही कट्यार सादर करताना कटाक्षानं टाळली.
दिग्दर्शक या नात्याने कट्यारसाठीच्या कलाकारांची निवड करणं खूपच आव्हानात्मक होतं. कारण या नाटकासाठी अभिनयाबरोबरच संगीताचं ज्ञान असणंही गरजेचं होतं. पण जेव्हा आदरणीय वसंतराव देशपांडे ज्यांनी जुन्या कट्यारमधली खाँसाहेबांची भूमिका अक्षरशः जिवंत केली, त्यांचाच नातू राहुल देशपांडे या भूमिकेसाठी तयार झाला तेव्हाच कट्यारच्या यशाची खात्री मिळाली. सगळ्यांची बिझी शेड्यूल्स सांभाळत आम्ही रात्रं- दिवस जागत रिहर्सल्स केल्या. नाटकाचं संगीत, सेट्स, पिरीयड लूक देणारे पोशाख असं सगळं मॅनेज करत शुभारंभाच्या प्रयोगाचा दिवस उजाडला ते कळालंच नाही. आम्ही सगळेच धडधडत्या अंतःकरणाने प्रेक्षकांना सामोरे गेलो. प्रयोग सुरु असताना प्रेक्षकांच्या सातत्यानं वाजणारर्या टाळ्या, त्यातील पदांना दिली जाणारी दाद आमचा आत्मविश्वास वाढवत होते. त्या प्रयोगाला प्रेक्षकांनी जो प्रतिसाद दिला तो मी आयुष्यात कधीच विसरणं शक्य नाही.
रसिकांनी भरभरुन दाद दिली असली तरी मनातली धाकधूक संपली नव्हती. केवळ एक नॉस्टॅल्जिया म्हणून किंवा उत्सुकतेपोटी तर प्रेक्षक आले नसतील ना असंही वाटत होतं. पण प्रत्येक प्रयोगानंतर मन शांत होत गेलं. रसिकांच्या प्रतिक्रिया खूपच उत्साहवर्धक होत्या. विशेष म्हणजे, सगळ्याच वयोगटातले, स्तरातले प्रेक्षक आवर्जून कट्यार पाहण्यासाठी येत होते त्याचं जास्त बरं वाटत होतं. कट्यारच्या यशस्वी सादरीकरणानंतर एक गोष्ट मात्र पटली आहे. ती म्हणजे संगीत नाटकांना आजही पहिल्यासारखाच प्रेक्षक वर्ग मिळू शकतो. मात्र ती सादर करताना काळाचं भान ठेवून मांडणी केली तर यश तुमचंच असतं.
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
मम ब्लॉग
आपल्या समाजात बोकाळलेला बेशिस्तपणा सध्या मला खूप त्रास देतो आहे. ज्यामध्ये सिग्नल सुरू
आजचा वाढदिवस

