फिरोदियाचा सुवर्ण इतिहास
’फ़िरोदिया करंडक आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा’-
* सुवर्ण इतिहास *(१९७४ - २०११)

डिसेंबर संपतो तशी महाविद्यालयाची पहिली टर्म संपते आणि अभ्यास, परीक्षा यांचे टेन्शन संपून महाविद्यालयीन युवकांना वेध लागतो ’फ़िरोदिया करंडक’ स्पर्धेचा. या निमित्ताने कलामंडळ पुन्हा एकदा सरसावतं. कलाकारांची निवड लेखकांचे नाविन्य, दिग्दर्शकाचे पणाला लागणारे कसब, थीम मधील वेगळेपण...असं बरच काही डोळ्यांसमोर ठेवून तयारी सुरू होते ’फ़िरोदिया करंडक’ स्पर्धेची.
फ़ेब्रुवारी महिन्यात स्पर्धेच्या दिवसात यशवंतराव चव्हाण नाट्यगृह परिसर गर्दीने फ़ुलून गेलेला असतो. कलाकारांची धावपळ, संयोजकांची गडबड हे सारे वातावरण शांत होते. रंगमंदिरातील तिस-या घंटेने क्षणातच सारे शांत व स्तब्ध होतात. सर्वांच्या नजरा खिळतात रंगमंचाकडे कारण तिथे घडणार असतो कलांचा मुक्त अविष्कार.
ज्यावेळी महाविद्यालयात स्नेहसंनेलन भरवणे अशक्य आहे, अशी परिस्थिती सर्व प्राचार्यांपुढे निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांच्यां कलागुणांना न्याय मिळत नव्हता. अशा वेळी आव्हान म्हणून स्पर्धेचे संयोजक सूर्यकांत कुलकर्णी यांनी स्पर्धेचा प्रस्ताव मांडला. अनेक प्राचार्य, प्राध्यापक यांच्या विरोधाला सामोरे जात ही स्पर्धा सुरू झाली. फ़िरोदिया कुटुंबाकडून प्रेरणा व सहकार्य मिळाले. आजही डॉ.जयश्री फ़िरोदिया व अरूण फ़िरोदिया यांचे सहकार्य आम्हाला आहे.
महाविद्यालयीन कलाकारांना आव्हान ठरलेली ही स्पर्धा आज ३६ वर्षे जिव्हाळ्याची बनली आहे. एखादे फ़ूल सूर्यास्ताला मिटावे आणि सकाळी अधिक दळदारपणे उमलावे तशी दर्जेदारतेने सादर होणारी ही स्पर्धा आकॄतीबंधाच्या कुठल्याच चौकटीत बंदिस्त नाही.
आज महाविद्यालयीन कलाकारांच्या कलागुणांना वाव मिळवून देण्यासाठी अनेक स्पर्धा घेण्यात येतात. पण त्या वेगवेगळ्या स्पर्धेत चमकलेले कलाकार आणि त्यांचे कलाविष्कार सारं एकत्रित, एकसंघ आणि आगळ्या वेगळ्या स्वरूपात पहायला मिळतात ’फ़िरोदिया करंडक’ स्पर्धेत.
सुरुवातीच्या काळात विवीध कलाप्रकारांचा गजरा अशा स्वरुपात असलेली ही स्पर्धा नावारुपाला आली, ती तिच्या वेगळेपणामुळे नृत्य, नाट्य, अभिनयाचा तर इथे कस लागतोच.पण त्याशिवायही चित्रकला,शिल्पकला, पाश्चात्य संगीत-नृत्य, पपेट शो, जादुचे प्रयोग,यांचाही साज चढलेला असतो. रोप मल्ल्खांब, योगासने, जिम हे कसरतीचे प्रकार न राहता "प्रयोगाच्या थीम" मधलाच एक भाग बनून जातात.
अवघ्या ४५ मिनीटांच्या वेळात आणि रंगभूमीच्या बंदिस्त अवकाशामध्ये कल्पनाही करता येणार नाही अशी थक्क करुन सोडणारी गतिमान दृष्यके रंगभूमीवर येउ लागतात ही ४५ मिनीटे काही वेळेस श्वास रोखून बघायला लावतात, तर काही वेळेस निखळ आंनदही देतात .तर कधी वास्तवातले एखादे दारुण सत्य मांडून नकळत डोळे भरुन आणतात. तर काही वेळेला ही ४५ मिनीटे चक्क बुध्दीलाच चालना, आव्हान देणारी ठरतात .
अशा विविध विषयात कधी भुतांची दुनिया समोर येते तर कधी स्वप्नांची. काही वेळेला तर ही ४५ मिनिटे आपल्याला घेऊन जातात बुद्धिबळाच्या पटावर नाहीतर कॅरम बोर्डवर. विषय कोणताही असो अनेक कलाप्रकाराच्या माध्यमातून साकार करणे हे एक आव्हानच. ते स्विकारणारे कलाकार त्या तोडीचेच असतात.
आणि म्हणूनच तरुणाई आणि सळसळता उत्साह ,तरूणाई आणि नाविन्याचा शोध यांचा कलेच्या माध्यमातून होणारा सुंदर आविष्कार घडवणारी स्पर्धा म्हणजे फ़िरोदिया करंडक "युवा कलाकारांच्या मुक्ततेला वाव देणारी ही मर्मबंधातील ठेव.
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







