अमेय वाघ
आपल्याला समॄद्ध करणारा `फिरोदिया करंडक’ -
तशी मला `फिरोदिया’ची ओळख झाली ती ११ वी मध्ये असतांना... त्यावेळी पहिल्यांदाच फिरोदियात सहभाग घेतला. त्या एकांकिकेच्या सादरीकरणाचा वेळ जास्त झाल्याने ती एकांकिका स्पर्धेबाहेर करण्यात आली. पहिल्यांदाच भाग घेतला आणि पहिल्याच वर्षी आम्ही बाद झालो याचं सर्वांनाच खूप दु:ख झालं. त्यांनतर माझं १२ वी चं वर्ष असल्यानं त्या अभ्यासाच्या धावपळीत मी दुस-या वर्षी भाग घेऊ शकलो नाही. मात्र आमच्या कॉलेजच्या एकांकिकेचा प्रयोग पहायला गेलो. आणि त्यावर्षीही सादर झालेली एकांकिका आधीच्याच कारणामुळे स्पर्धेबाहेर केली गेली. दोनदा आमच्या कॉलेजच्या एकांकिका बाहेर गेल्याने जास्तच वाईट वाटलं.
त्यानंतर एफ़.वाय. ला असतांना मी सिनिअर असल्याकारणाने माझ्यावर एकांकिका दिग्दर्शनाची जबाबदारी टाकण्यात आली. पण मला अभिनय करायचा होता. त्याचं कारण असं की, दिग्दर्शन म्हटलं की अनेक जबाबदा-या असतात. खूप गोष्टी बघाव्या लागतात. आणि मला दिग्दर्शन करण्याइतका अनुभवही नव्हता. पण नंतर विचार केला की, आधीच दोनदा आपल्या कॉलेजच्या एकांकिका बाहेर झाल्यात यावर्षी असं होता कामा नये. म्हणून मी तेव्हा `प्रलय’ ही एकांकीका दिग्दर्शित केली होती. प्रॅक्टीस पूर्ण झाली. कसं झालं असेल, काय झालं असेल, थोडं टेंन्शन होतच, म्हणून रंगीत तालीम करतांनाच काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांना ती एकांकिका पहायला बोलावलं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती सर्वांना खूप आवडली. सगळया गोष्टी वेळेत झाल्या. कारण या गोष्टीकडे मी जास्त लक्ष दिलं होत. एकदा मला बेस्ट अॅक्टरही मिळालं होतं.
`फिरोदिया’चा माझ्या करीअरमधे नक्कीच फायदा झाला असं मला वाटतं. ही स्पर्धा अनेक गोष्टी आपल्याला शिकवून जाते. एकप्रकारे मॅनेजमेंटचे धडे देणारी ही सगळी प्रोसिजर असते. त्यात एका तासात तुम्हाला सगळं करायचं असतं. मग तो सेट असो, लाईट्स असो, म्युझिक असो की आणखी काही...एक एक बाब वेळेत तुम्हाला करावी लागते.
`फिरोदिया करंडक’ ही स्पर्धा अतिशय उत्तम असा प्लॅटफॉर्म आहे. त्यातुन जो अनुभव मिळतो, तो आपल्याला समॄद्ध करणारा अनुभव असतो. मात्र, सध्या काय होतंय की, एखादं नाटक करतांना त्याच त्याच गोष्टी करून ते स्टिरीओ-टिपिकल होण्याची शक्यता असते. ते टाळायचे असेल तर त्यात क्लासिकल यायला हवं, मॉडर्न यायला हवं. ही एक वेगळ्या ढंगाची स्पर्धा आहे, मग त्यानुसार नवीन थिम, नवीन विषय हाताळले गेले पाहिजे.
* किस्सा- `फिरोदिया’त प्रथम आलेल्या काही एकांकिकांचे प्रयोग लावण्यात आले होते. त्यावेळी माझं १२ वी चं वर्ष असल्याने मी एकांकिकेत नव्हतो. त्यात किस्सा असा झाला की, त्या एकांकिकेतील एक कलाकार काही कारणास्तव येऊ शकत नव्हता. मग मला मित्राने फ़ोन केला की, असं असं घडलं. मला तुझी मदत हवी. मला खरच टेंन्शन आलं. आई-बाबांना कसं विचारू, ते काय म्हणतील. या सर्व गोष्टी गरागरा डोक्यात फिरू लागल्या. पण तरीही मी विचारलं आणि त्यांनी लगेच परवानगी दिली. ३ तासात मला प्रॅक्टीस करावी लागली कारण सायंकाळी प्रयोग होता. प्रयोग खूप छान झाला. हा प्रयोग बघायला आई-बाबाही आले होते. त्यावर्षी मला १२ वी मधे चांगली टक्केवारीही मिळाली आणि त्यावर्षी `फिरोदिया’ मी न केलेल्या नाटकात काम करण्याचं समाधानही मिळालं.
शब्दांकन - अमित इंगोले
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







