त्यागराज खाडिलकर

Images: 

‘फिरोदिया करंडक’ - एक अनुभव ! - संगीतकार त्यागराज खाडिलकर
साधारण १९८३-८४ चा काळ असावा..आमच्या ‘मॉडर्न कॉलेज’च्या प्राध्यापकांनी फर्मान काढलं की, ‘फिरोदिया करंडक’ स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणा-या मुलांनी अमुक दिवशी तमुक ठिकाणी जमावं. कोल्हापूरहून पुण्याला शिक्षणासाठी आलेला मी आंतरमहाविद्यालयीन स्तरावर कलाकार म्हणून चमकण्यासाठी एखादी नामी संधी शोधतच होतो...! मी विचारलं, "पण सर, फिरोदिया म्हणजे काय?" ते म्हणाले, "काही नाही रे...विविध गुणदर्शन स्पर्धा !" बस्स्...! स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेणा-या आमच्या कॉलेजला फिरोदियाबद्दल एवढीच माहिती होती!

नव्यानेच सुरू झालेल्या आमच्या कॉलेजमध्ये मला इतर गुणवान विद्यार्थी सापडेनात, म्हणून मी एकटयानीच स्पर्धेत भाग घ्यायचा असं ठरवलं, आणि दिली एंट्री पाठवून बिनधास्त! स्पर्धेच्या दिवशी पाहिलं तर भरत नाटयमंदिर तरूणाईने ओसंडून वाहात होतं. आमच्या आवडत्या कॉलेजेसचे परफॉर्मन्सेस प्रेक्षागृहात बसून पाहू लागलो. आणि ते पाहताच माझ्या पोटात प्रचंड गोळा आला! त्यांच्या सादरीकरणाला कॉन्सेप्ट होती, स्क्रिप्ट होती, दिग्दर्शक होते, अनेक अभिनेते होते, गायक-वादक-नर्तक होते, आणि इथे आमच्या कॉलेजच्या वतीने होतो फक्त एकटा! मी...!

एकदा वाटलं की, जाऊ या पळून, पण दुसरं मन म्हणालं की काय हरकत आहे? स्टेजवर जाऊन तर येऊ..आपली टिंगल, कुचेष्टा झाली तर झाली. पण मॉडर्न कॉलेजची एंट्री कॅन्सल झाली, असा बोभाटा होता कामा नये.

मॉडर्न कॉलेजचं नाव पुकारताच पडदा उचलला गेला आणि मी घुसलो स्टेजवर माईक हातात घेऊन. स्वत:च स्वत:चं नाव सांगून थेट सुरू केलं गाणं. ‘नमक हलाल’ मधलं ‘के पग घुंगरू’ वादक वगैरे काही भानगड नसल्याने मीच तोंडाने म्युझिक सुद्धा वाजवू लागलो, आणि समोरची प्रेक्षक पोरं गडाबडा लोळुन हसू लागली आणि हसता हसता नकळत टाळ्यांनी ताल देऊ लागली! त्यानंतर मी गायलेल्या ‘दयाघना’च्या आर्ततेत पूर्ण विरघळलो. आणि त्यानंतर मी सादर केलेल्या किशोरकुमार आणि भिमसेनजींच्या नकलांना डोक्यावर उचलून धरलं.....मॉडर्न कॉलेजचं हे ‘एकपात्री’ विविध गुणदर्शन १५/२० मिनिटात संपलं, आणि त्यावर्षीचा मला सर्वोत्कृष्ट गायक आणि सर्वोत्कृष्ट नकलाकाराचा पुरस्कार मिळाला! या पुरस्काराने दिलेल्या आत्मविश्वासामुळे, प्रतिष्ठेमुळे आणि ‘आत्मभाना’मुळेच मी इथपर्यंट प्रगती करू शकलो! म्हणूनच फिरोदिया ही केवळ एक स्पर्धा नव्हे, तर एक समृद्ध अनुभव जीवन बदलून टाकणारा !!