प्रसाद ओक

Images: 

‘फिरोदिया करंडक’मध्ये मी १९९३ साली पार्टिसिपेट केलं होतं. त्यात विजय पटवर्धन या आमच्या मित्राने लिहिलेली ‘वाट संपता संपेना’ ही एकांकीका केली होती. या एकांकीचेची आम्ही ‘वाट लागता लागेना’ केली होती. या एकांकीकेचं दिग्दर्शन आमचा मित्र कै.गिरीश आठले याने केलं होतं. यात एका लेखकाची व्यथा मांडण्यात आली होती. आणि माझी भूमिका होती ती एका दिग्दर्शकाची...माझं स्वप्नही तेच होतं कदाचित त्यासाठीच मी मुंबईत आलोय. या एकांकीकेसाठी मला बेस्ट अ‍ॅक्टरचं पारितोषिक होतं. खूप धमाल केली होती आम्ही सर्वांनी....सकाळी ७ ते रात्री १० पर्यंत पिटी हॉलमधे आम्ही प्रॅक्टीस करायचो. त्यावेळी आमच्या टीममध्ये राजू बावडेकर, सुनील देव(चिखल), विनोद सातव, संदिप पाटील, विशाल इनामदार हे होते. प्रयोग खूप चांगला झाला. ज्यांनी ज्यांनी एकांकिका पाहिली ते सर्व जण म्हणत होते की, या प्रयोगाला करंडक नक्की मिळणार. मात्र दुर्दैवाने वेळ जास्त झाली आणि एकांकिका डिबार झाली.

या एकांकिकेतील एक गाणं त्यावेळी अमृता नातूनेही गायलं होतं. आणखी त्यात आम्ही ‘एक चतुर नार’ गाणं घेतलं होतं आणि त्यातील एक छोटा पिस मी गायला होता. तसंच त्यात एक भांगडाही केला होता. आणि संदिप पाटीलने या प्रयोगात मुकेश खन्ना यांची मिमिक्री केली होती. चांगलीच धमाल केली होती. फिरोदियाच्या खूप आठवणी आहेत ज्या आजही आठवतात आणि मन सुखावतं. त्यातली एक खास आठवण म्हणजे त्यावेळी आम्ही सर्वजण विशालच्या फ़्लॅटवर एकत्र जमायचो आणि खूप धमाल करायचो.