राजेश कोलन
‘फिरोदिया करंडक’मुळे कलेच्या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा मिळाली - राजेश कोलन
‘फिरोदिया करंडक’ हा कॉलेज विश्वातला अतिशय मानाचा आणि बहुरंगी करंडक असून मी या स्पर्धेकडे एका फिल्म सारखं बघतो. या रंगमंचावर सादर केल्या जाणा-या एकांकिका ‘फिल्म’ चा अनुभव देतात. खरं तर आज मी लेखन, दिग्दर्शन क्षेत्रात जे काम करतोय, त्याचं श्रेय मी ‘फिरोदिया’ला देईन. या क्षेत्रात काम करण्याची प्रेरणाही मला या ‘फिरोदिया’ मधूनच मिळाली आहे. यात सादर होणा-या वेगवेगळ्या आर्टस मधून कलाकार त्यांना जे सांगायचं असतं ते सांगतात.
मी ‘बीएमसीसी’ महाविद्यालयात असतांना ‘ऑल द घोस्ट’ ही विजय पटवर्धन लिखित आणि दिग्दर्शित एकांकिका आम्ही केली होती. या एकांकिकेबद्दल सांगायचं झाल्यास, आम्हाला एकांकिका करायची आहे असं चार-पाच महिन्यांआधीच ठरलं होतं. पण तेव्हा कथेचाच थांगपत्ता नव्हता. त्यावेळी विजय(विजय पटवर्धन) म्हणायचा की, माझ्याकडॆ पंचेस आहेत तुम्ही एखादी गोष्ट सांगा. मग ती एकांकिका लिहिली गेली. त्यावेळी या एकांकिकेतील माझ्या भूमिकेला अभिनयाचं पारितोषिक मिळालं होतं.
दुस-या वर्षीही फिरोदिया मधे सहभाग तर घ्यायचाच होता. पण परत विषयाची बोंब. विषय काही सुचेना. मग अचानक सुचलं की, ‘ऑल द घोस्ट’ याच एकांकिकेचा पार्ट टू काढावा. ‘फिरोदिया’च्या इतिहासात अशाप्रकारे एकाच एकांकिकेचा दुसरा पार्ट पहिल्यांदाच सादर करण्यात आला. याच काळात नेमका मी नोकरी करत होतो. मग प्रॅक्टीससाठी वेळेचा प्रॉब्लेम. ऑफिस सोबतच प्रॅक्टीसही व्हावी म्हणून तेव्हा सकाळी सहाला आम्ही प्रॅक्टीस करायचो. ही एकांकिकाही चांगलीच झाली होती.
कॉलेज सोडल्यानंतरही मी आणि विजय ‘फिरोदिया’साठी लेखन-दिग्दर्शन सुरू ठेवलं. सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी आम्ही लेखन-दिग्दर्शन केलं. ‘फिरोदिया’च्या इतिहासात सगळ्यात गाजलेली एकांकिका म्हणजे ‘बॅक टू स्कूल’ ही एकांकिका आम्ही केली होती. फिरोदिया करंडक काय आहे, त्यात कसं सादरीकरण केलं जातं, ते कसं करावं हे सांगण्यासाठी आजही ही एकांकिका नवीन कलाकारांना दाखविली जाते.
आज अनेक कलाकार सादरीकरण करतात ते आणखी चांगले केले जाऊ शकतात. नवीन कलाकार सादरीकरण करत असतांना कधी कधी एकाच गोष्टीला जास्त महत्व देतात. आज सकस लिखाणाची सुद्धा खूप गरज आहे. ब-याचदा सादरीकरण करत असतांना खूप गोष्टी केल्या जातात पण त्या एकांकिकेच्या कथेशी, त्या विषयाशी रिलेटेड नसतात. थिमशी रिलेटेड गोष्टी करायला पाहिजे. या स्पर्धेत जे इतर आर्टस सादर होतात तेही अत्यंत दर्जेदार असतात. म्हणूनच ‘फिरोदिया करंडक’ ही माझी आवडती स्पर्धा आहे.
* खास किस्सा - दुस-या वर्षी मी नोकरी करायचो. मग ऑफिसमधे काहीतरी कारण सांगावं लागणारंच ना. मग मी बॉसला खोटं सांगितलं की सर माझे डोळे आलेत. आता त्यांना हे पटवून देणं भाग होतं म्हणून त्यांच्यासमोर जाण्याआधी डोळे चोळून चक्क लाल केलेत. तेव्हा त्यांचा विश्वास बसला आणि त्यांनी लगेच घरी पाठवलं.
शब्दांकन - अमित इंगोले
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







