राहूल देशपांडे
‘फिरोदिया करंडक’ मुळे नवीन आणि सुजाण कलाकार पुढे येत आहेत- राहूल देशपांडे
‘फिरोदिया करंडका’ची एक खास गोष्ट मला आवडते, ती म्हणजे ही स्पर्धा नुसती एकांकिका स्पर्धा नसून ती विविध गुणदर्शन स्पर्धा आहे. मी बीएमसीसी कॉलेजमधे असतांना प्रत्यक्षात यात काम केलंय. पण त्यावेळी मी फक्त संगीत द्यायचो आणि गायचो. मी त्यावेळी अभिनय कधी केला नाही. कॉलेजमधून पासआऊट झाल्यावरही विविध कॉलेजला मार्गदर्शन करत किमान ६ ते ७ वर्ष मी फिरोदिया केलंय. खरं तर ‘फिरोदिया करंडक’मुळे आज नवनवीन आणि सुजाण कलाकार, लेखक, दिग्दर्शक पुढे येत आहेत. त्यांना मोठी संधी मिळत आहे.
‘फिरोदिया करंडक’कडे मी एका फिल्मसारखाच बघतो. तिथे सादर होणा-या कलाकृतीत गाणी, कथानक, नृत्य असतं म्हणजेच एक संपूर्ण पॅकेज असतं. मी माझ्या ग्रुप मधे फक्त शास्त्रीय संगीतचं गायचो. मला त्यातला ऑर्केस्ट्रा खूप आवडायचा. जवळपास सगळीच वाद्य मी वाजवायचो. ब-याचदा आपल्याकडे रिसोर्सेस कमी पडतात. वाजवण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कामासाठी कुणी योग्य माणूस मिळतच नाही. त्यामुळे फिरोदिया करत असतांना बर्याचदा अनेक अडचणी यायच्या. अनेकदा मीच गाता गाता वाद्यही वाजवायचो. अशा अनेक आठवणी अजूनही मनाला मोहून टाकतात.
स्पर्धेच्या नियमानुसार १५ मिनिटांमध्ये तुमचे नेपथ्य, म्युझिक, लाईट्स सेट व्हायला हवेत, त्यात कुठेही चूक होता कामा नये. कारण यात केलं जाणारं काम एक टीमवर्क असतं. यावरून एक किस्सा मला आठवतो, एकदा एक मुलगी कि-बोर्ड वाजवतांना चक्क गाण्याचा पिस विसरली, मी भडकलो आणि तिला परत पाठवलं. सांगायचं तात्पर्य हेच की, तुम्हाला परफेक्ट राहायला लागतं. ब-याचदा जेव्हा एखाद्या कलाकृतीचं सादरीकरण होतं तेव्हा त्यातील काही गोष्टींचा कथानकाशी काही एक संबंध नसतो. सादरीकरणात असलेली प्रत्येक गोष्ट ही कथानकाशी सूट व्हायलाचं हवी. असं माझं मत आहे. मी त्यावेळी ‘काय पाहिलंस ह्याच्यात?’ आणि ‘आम्ही सारे बच्चन’ या एकांकिकांसाठी काम केलंय.
पण खूप मजा असायची. ब-याचदा माझे मित्रच परिक्षक म्हणून असायचे त्यामुळे रिझल्ट काय लागणार हे आधीच कळायचं. मी पासआऊट झाल्यावर ‘आयएलएस कॉलेज’ला खूप वेळा मार्गदर्शन करायला जायचो. तेव्हाही खूप मजा यायची. हे जे दिवस असतातना ते आयुष्यभर आपल्या स्मरणात राहतात. कुठलही टेंशन नसतं, जबाबदा-या नसतात फक्त मजा करायची असते. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या स्पर्धेचा आपल्याला पुढील आयुष्यात किंवा करिअरसाठी कुठे ना कुठेतरी नक्कीच फायदा होतो.
मला आधीपेक्षा आत्ताचं फिरोदिया बघायला जास्त आवडतं. मी बीएमसीसी मध्ये असेपर्यंत चांगला फिरोदिया झालाच नाही. त्यावेळी आम्ही फक्त मॅड कॉमेडी करायचो. असे काही गंभीर किंवा करंट विषय घेऊन कधीच एकांकिका केली नाही. आज मात्र नवनवीन कलाकार संवेदनशील आणि चालू घडामोडींवरील विषय घेऊन कलाकृती सादर करतात. आता ते प्रकर्षाने जाणवतं. आत्ताच्या मुलांमुळे ‘फिरोदिया करंडक’ स्पर्धेत चांगलाच बदल घडला आहे. असं म्हटलं तरी चालेल.
शब्दांकन - अमित इंगोले
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







