सिद्धार्थ चांदेकर
कुठेही न शिकायला मिळाणा-या गोष्टी शिकवणारा ‘फिरोदिया करंडक’- सिद्धार्थ चांदेकर
‘फिरोदिया करंडक’ ही अख्या महाराष्ट्रात होणारी एकुलती एक अशी स्पर्धा आहे. ‘फिरोदिया’ ही फक्त अभिनयच नाही तर कलाकारांना त्यांच्यातील असलेले विविध गुणदर्शन प्रेक्षकांसमोर सादर करण्याची संधी देणारा एक उत्तम प्लॅटफॉर्म आहे. ही स्पर्धा खूप गोष्टी शिकवून जाते. ज्या आपल्याला आपल्या पुढील जीवनात नक्कीच उपयोगी पडतात.
तसा मी आठव्या वर्गात असल्यापासून ‘फिरोदिया’ पहायचो. आतापर्यंत मी तीनदा फिरोदिया केलंय. मी फिरोदियात पहिल्यांदा प्रत्यक्ष सहभाग घेतला तो ११ वीत असतांना...ती एकांकिका होती "आय विद इन आय"... त्यानंतर १२ वीत असतांना केली ती "कन्डिशन्स अप्लाय" ही एकांकिका. आणि त्यावेळी या एकांकिकेला करंडक मिळाला होता. तेव्हा ‘फिरोदिया’ करत असतांना एक जाणवलं की, नियमानुसार त्या टीममधे २५ जण असतात. पण प्रत्यक्षात त्यात २५ जणांचीच मेहनत नसून ती ५० पेक्षा जास्त जणांची मेहनत असते.
ज्या गोष्टी ‘फिरोदिया’मधे शिकायला मिळतात. त्या कुठेही शिकविल्या जात नाहीत, कोणत्याही मॅनेजमेंन्ट कॉलेजला ते शिकविलं जात नाही. स्पर्धा अनेक आहेत पण त्यात फ़क्त अभिनय, लेखन याच गोष्टींवर भर दिला जातो. मात्र ‘फिरोदिया’त तसं नाही, इथे सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. मग त्यात नृत्य, संगीत, पेंटींग, असे अनेक इव्हेंट असतात आणि तेही नियमानुसार...या स्पर्धेत जे करावं लागतं. ते या क्षेत्रात काम करणा-या कलाकारांना रोज पहावं लागतं. त्यावेळी प्रॅक्टीस करतांना ज्या गोष्टी कराव्या लागतात, जी मेहनत घ्यावी लागते, ती रोज करायला लागते. त्यावेळी केलेल्या प्रत्येक गोष्टींचा आज या क्षेत्रात काम करतांना बराच फायदा होतो. खरंच अशी दुसरी स्पर्धा होऊच शकत नाही. स्पर्धेचे आयोजकही मुलांना सहकार्य करतात. आणि स्पर्धेचं आयोजनही उत्तम करतात.
* किस्सा - ११ वीत असतांना ‘आय विद इन आय’ सगळं बसवून झालं होतं. सादरीकरणासाठी फक्त चार दिवस बाकी राहिलेले असतांना लक्षात आलं की, हे चांगलं होत नाहीय. एकदा परत बसून सगळं पाहिलं, तरीही ते काही जमेना. मग सगळ्यांनी विचार केला आणि पुढील चार दिवसात त्या एकांकिकेची स्क्रिप्ट पुन्हा लिहून काढली. परत प्रॅक्टीस सुरू केली. तेव्हा वाटलं आता हे नाटक घडू शकतं. त्यावेळी चार दिवस आणि चार रात्री आम्ही सगळे कॉलेजच्या बाहेर गेलो नव्हतो. सादरीकरणाला काही वेळ शिल्लक असेपर्यंतही मी स्क्रिप्ट पाठ करत होतो. त्यावेळी त्या एकांकिकेसाठी आम्हाला बेस्ट ग्रुप डान्स, बेस्ट बॅन्ड, बेस्ट अॅक्ट्रेस अशी ८ प्राईजेस मिळाली होती.
शब्दांकन - अमित इंगोले
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







