हेमंत ढोमे
या स्पर्धेने उमेद दिली या क्षेत्रात काहीतरी करून दाखविण्याची! - हेमंत ढोमे
फॉर्म भरायची शेवटची डेट जवळ आली आणि आम्ही ठरवलं की, ‘फिरोदिया करंडक’मधे उतरायचं. घाईघाईने फॉर्म भरला, पण आता? आमच्यासाठी ही स्पर्धा अगदीच नवीन होती, गरवारे महाविद्यालय पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेत होतं! या स्पर्धेतले वेगवेगळे कलाप्रकार आणि त्यांची गुंफण करणं हे सगळ्यात अवघड काम होतं!
पण माझा बॅचमेट आणि मित्र चैतन्य आडकर आणि मी ठरवलं होतं, की ही स्पर्धा नुसती करायची नाही तर ती जिंकायची! आम्ही आमच्या टीमसोबत जोराने तयारी सुरू केली, कसं माहीत नाही सगळं जुळून आलं! माझा मित्र विशाल इनामदार याने लिहीलेली ‘रोमॅन्सर्स’ ही एकांकिका आम्ही निवडली, चैतन्यने गाण्यांची बाजू सांभाळली, मी नाटकाची! आमच्या सगळ्या टिमने रात्रंदिवस कष्ट घेतले! गमतीचा भाग म्हणजे, शेवटचे तीन दिवस तर आम्ही घरीच गेलो नव्हतो..
लोकं म्हणतात स्पर्धेची गणितं असतात! आम्हाला ती माहीत नव्हती (माझं तर मुळात शाळेपासूनच गणित वाईट) आम्ही जे केलं त्यात २०० टक्के देण्याचा प्रयत्न केला, प्रयोग झाला! आम्ही १२ वैयक्तिक पारितोषिकांसह प्रथम क्रमांक पटकावला, पोरं ३ दिवसांनी घरी गेली ती बक्षिसांसोबतच...मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचं बक्षिस मिळालं, सगळीकडे कौतुक झालं! गरवारे महाविद्यालयाने पहिल्याच वर्षी पहिलं पारितोषिक पटकावलं याचा जास्त आनंद झाला...
आता मागे वळून पाहतो तेव्हा वाटतं की, या स्पर्धेने उमेद दिली या क्षेत्रात काहीतरी करून दाखविण्याची! आता मी जे काही हातपाय मारतोय ते त्यावेळी झालेल्या कौतुकामुळे! चैतन्य आडकर सुद्धा आता चित्रपटांना संगीत देतो, त्यात तो चांगलं काम करतोय! याचा मला खूप आनंद होतो. या स्पर्धेने जपलेल्या वेगळेपणामुळेच ही स्पर्धा इतरांपासून वेगळी आणि लोकप्रिय बनलीय, या स्पर्धेतुन असेच नवनवीन कलाकार यावेत हिच इच्छा!
स्पर्धेला आणि स्पर्धकांना खूप खूप शुभेच्छा!
हेमंत ढोमे
- प्रतिसाद देण्यासाठी लॉगिन करा अथवा नवे सदस्य बना
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







