'आलटून पालटून'- अभिरामचं नवं कोर नाटक
अभिराम भडकमकर एक उत्तम लेखक आणि अभिनेता म्हणून तो परिचित आहे. 'पाहुणा', 'स्थळ स्नेहमंदिर','ज्याचा त्याचा प्रश्न','देहभान' अशी सरस आणि आशयघन नाटकांमुळे तो ओळखला जातो केवळ हीच त्याची ओळख नाही तर त्याने अनेक उत्तम चित्रपटांचं लेखन केलं आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'बालगंधर्व' चित्रपटाला रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळतो आहे. चंद्रवलयची निर्मिती असलेलं' आलटून पालटून' हे नवं नाटक रंगभूमीवर येतंय, त्याचं लेखन असलेलं नाटक म्हणजे काहीतरी नवं पाहायला मिळणार हे नक्की.
* आजवर तुमच्या नाटकांचा विचार केला तर ती आशयघन आहेत मात्र हे तुमचं नवीन नाटक थोडसं ओपन फॉर्म असणार आहे, त्याविषयी काय सांगाल?
- आजवर मी माझ्या लेखनात अनेक प्रयोग केले आहेत. एक गंभीर विषय विनोदाच्या अंगाने पुढे सरकत जातो ही एक फँटसी आहे. ही आज ना उद्या आपल्या समाजात वास्तव म्हणून येण्याची शक्यता आहे. आणि ही फँटसी कॉमेडीच्या अंगाने खुलवत नेली आहे. त्यामुळे मला वाटतं की फॉर्मच्या बाबतीत हे एक वेगळं नाटक आहे. आशयाच्या बाबतीत सुध्दा एक वेगळेपण या नाटकात आहे. आणि मला नेहमी वाटतं की आशयघन नाटकं नेहमी गांभीर्याचं वळण घेणारी, वैचारिक अंगाने जाणारीच असली पाहिजेत असं नाही तर ती विनोदी पध्दतीनेही मांडता येऊ शकतात.
* या नाटकाचं दिग्दर्शन समीर विद्वांस करत आहेत तर आजच्या तरूणांचे प्रश्न, त्यांचा संघर्ष यांना तुम्ही दोघं न्याय देण्याचा प्रयत्न करत आहात, असं वाटतं का?
- आजच्या तरूण पिढीचे प्रश्न खूप वेगळे आहेत. आजचं जग खूप वेगानं बदलतयं. जगातल्या अनेक समस्याचं स्वरूप आज बदलत चाललं आहे. तर अशा परिस्थितीत त्या प्रश्नांकडं वेगळया बाजूनं पाहणं सोपं गेलं तर आजच्या तरूणांच्या समस्या त्यांची मानसिकता यांचा विचार करणं मला काय किंवा समीर, प्रसाद आम्हाला सगळयांना ते रिलेट करणं, विचार करणं सोपं गेलं.
* या नाटकाच्या वैशिष्टयाबद्दल एक लेखक म्हणून तुम्ही काय सांगाल?
- आपल्याकडे असा समज असतो की रंगभूमीवरचं नाटक म्हणजे बॉक्स हिट हवं. पण याहीपेक्षा अनेक वेगळया शक्यतांचा विचार करून हे नाटक केलं आहे. त्यामुळे एक वेगळया फ्री फॉर्मचं हे नाटक आहे. तसंच खळखळून हसवता हसवता आपल्या कुटुंबसंस्थेकडे, स्त्री पुरूष संबंधाकडं वेगळया विचारांनी पाहायला लावणारं हे नाटक आहे. हे या नाटकाचं वैशिष्टय आहे असं मला वाटतं. देव माणसावर टीकाटिप्पणी करतात ही या नाटकाची गंमत आहे.
* आज व्यावसायिक रंगभूमीवर निरनिराळे प्रयोग होतायेत तर हे नाटकही असंच आहे का?
- मला असं वाटतं की आपल्या मराठी रंगभूमीवर सुरूवातीपासूनच प्रयोग होत आले आहेत. त्यामध्ये विजया मेहतांनी प्रयोग केले आहेत. 'बॅरिस्टर'सारखं नाटक असेल जयवंत दळवींनी प्रयोग केले आहेत. जर नव्वदच्या दशकाचा विचार केला तर त्यात मी असेन प्रशांत दळवी, अजित दळवी, शेखर ढवळीकर असतील आम्ही सर्वांनी आमची नाटकं व्यावसायिक रंगभूमीवर केली तरी त्यात नेहमी प्रयोग केले. मला वाटतं की आता व्यावसायिक आणि प्रायोगिक रंगभूमीची रेषा आता पुसट होत चालली आहे. त्यावेळी आमच्यावर अनेकदा टीका झली की व्यावसायिक रंगभूमीवर प्रयोग होत नाहीत वगैरे. मात्र तरी आम्ही नेटाने आमचे प्रयत्न सुरू ठेवले आणि आज असं दिसतयं की व्यावसायिक रंगभूमीवर अनेक चांगले प्रयोग होताना दिसत आहेत. ही आपल्या व्यावसायिक रंगभूमीची ताकद आहे. आणि आमचं सुदैव की आम्ही ती तेव्हा ओळखली. त्यामुळे आम्ही अनेक नवीन प्रयोग करू शकलो.
* या नाटकातली अनेक मंडळी मालिकांमध्ये व्यस्त असणारी आहेत, तर त्यांच्यासोबत कामाचा अनुभव कसा होता ?
- त्यांच्यासोबतचा कामाचा अनुभव खूपच छान होता. या सर्व लोकांनी शेवटचे पंधरा दिवस खूप वेळ दिला. प्रसादने तर ठरवलं होतं की नाटक ओपन होईपर्यंत कुठलंही नवीन काम घ्यायचं नाही. आणि त्याने तशी कमिटमेंट पाळली. सर्वांनी केलेली चोख रिहर्सल यामुळे इतर कलाकारांनी सुध्दा वेळ दिला त्यामुळे सुरूवातीपासूनचे प्रयोग उत्तम झाले.
* नाटकाचे आता तीन प्रयोग झाले आहेत, त्यानंतर तुम्हाला मिळणारा रसिकांचा प्रतिसाद कसा होता ?
- मी सुरूवातीपासून एका विशिष्ट शैलीत अडकून पडलो नाही. त्यामुळे माझ्या वैविध्यपूर्ण शैली जाणणारा एक चाहतावर्ग आहे. आजवर जे तीन प्रयोग या नाटकाचे झाले त्यावेळी मला असं लक्षात आलं की मी हा जो वेगळा प्रयोग कॉमेडीच्या अंगाने जाणारा केला तो प्रयोग लोकांना आवडला असल्याचं मला लक्षात आलं. लोकांनी जो भेटून प्रतिसाद दिला, फोन केले त्यावरून आता मी रिलॅक्स झालो आहे.
* चित्रपट आणि नाटक या दोन्ही माध्यमांमध्ये तुम्ही काम करत आहात, तर नाटकाचे प्रयोग सुरू झाल्यानंतरचं फीलिंग यामध्ये काय फरक असतो?
- 'बालगंधर्व' चित्रपटाचं चित्रिकरण संपलं त्यानंतर त्या चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद सतत सुरूच आहे. म्हणजे आजचं ताजं उदाहरण सांगायचं म्हणजे ज्येष्ठ साहित्यिक ह.मो.मराठे यांचा फोन आला होता ते म्हणाले की ,'अभिराम मी चित्रपट पाहिला आणि तो मला खूप आवडला'. या गोष्टीचं समाधान असतं की एवढया मोठया माणसावर आपण चित्रपट लिहिला आणि तो लोकांपर्यंत पोहोचला.
नाटकाचं कसं असतं की तुम्हाला प्रत्येक प्रयोगात सुधारणा करण्याची संधी असते. नाटकात काही ठिकाणी असं वाटतं की अरे हा सीन वर्क होत नाहीये तर हा पुन्हा करूया. नाटकात ती संधी असते चित्रपटात ती नसते.
* हे नाटक 'चंद्रवलय' निर्मितीसंस्थेमार्फत रंगभूमीवर येतयं, त्याविषयी काही वेगळा विचार होता का ?
- फार वर्षापासून मी दिनू पेडणेकर, मृणाल आणि संतोष काणेकर आम्ही एकत्र नाटक करूया असं बोलत होतो. जेव्हा मी कॉमेडी नाटक लिहिलं तेव्हा दिनू पेडणेकर म्हणाले की ते आपण वाचूया त्यामुळे ही काही वर्षाची कमिटमेंट होती. ती या नाटकामुळे पूर्ण झाली असं मला वाटतं.
* समीर विद्वांसबरोबर तुम्ही प्रथमच नाटक करत आहात, तर हा अनुभव कसा होता?
- समीरसोबत काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. त्याने व्यवस्थित नाटक समजून घेतलं. त्यामुळे काम करायला मजा आली. केवळ एवढंच नाही तर प्रसाद ओक, विकास, सुजाता ,मौसमी यांच्यासोबत काम करायला मजा आली. निलेशचं संगीत , शीतल तळपदेची प्रकाशयोजना अशी सर्वच टीम मस्त आहे.
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







