'आलटून पालटून' उत्तम अनुभव - सुजाता जोशी
'बॅरिस्टर','एका लग्नाची गोष्ट' सारखी उत्तम नाटकं, 'साडे माडे तीन'हा मराठी हिट चित्रपट, 'असंभव', 'शुभं करोति'आणि 'हाऊसफुल्ल'मालिकेचं सूत्रसंचालन. आता या अभिनेत्रीचं नाव ओळखणं तुमच्यासाठी फार अवघड नसेल. सुजाता जोशी हे त्या अभिनेत्रीचं नाव. मालिका, चित्रपट आणि रंगभूमीवर तिने स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. 'आलटून पालटून' हे तिचं नवं नाटक. या नाटकाचे पंधरा प्रयोग झाले आहेत. या नाटकाला रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे. नाटकातल्या तिच्या भूमिकेविषयी 'मम टीम'ने तिच्याशी गप्पा मारल्या....
* प्रसाद ओकचं कमबॅक, अभिराम भडकमकरचं नवीन ओपन फॉर्मचं नाटक, समीर विद्वांसंचं दिग्दर्शन आणि अशा नाटकात तुझी मध्यवर्ती भूमिका, अशा या नाटकाचा अनुभव तुमच्यासाठी कसा होता?
- अभिरामने या नाटकाचं लिखाण खूपच छान केलं आहे त्यामुळे नाटक करताना सहजता जाणवते. आणि समीर बरोबर मी आधी कधी काम केलं नव्हतं. तो माझा खूप जुना मित्र आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करण्याची इच्छा होतीच. त्यामुळे तो दिग्दर्शन करत असलेलं हे नाटक करायला खूप मजा आली. महत्त्वाचं म्हणजे ह्या नाटकातील मी आजच्या जनरेशनची मुलगी आहे. मात्र मी काम केलेल्या 'बॅरिस्टर' नाटकातील माझी भूमिका शंभर वर्षापूर्वीच्या मुलीची होती. ह्या दोन्ही भूमिका म्हणजे दोन ध्रुव आहेत. आणि अशी विनोदी भूमिका 'एका लग्नाची गोष्ट' या नाटका नंतर मी केलीही नव्हती. त्यामुळे मला या भूमिकेबद्दल उत्सुकता होती.
* हे नाटक म्हणजे एक कॉमेडी आणि फॅंटसी आहे, या विषयाबद्दल तुम्ही काय सांगाल?
- हो हे नाटक हलकं फुलकं विनोदी असलं तरी या बघा, हसा आणि जा असं हे नाटक नाही. टाईमपास म्हणून बघितलं असं हे नाटक पाहिल्यावर नक्की वाटणार नाही. प्रेक्षक स्वत: बरोबर ह्या नाटकाचा संदेश घेऊन बाहेर पडतो.
* 'एका लग्नाची गोष्ट' आणि 'आलटून पालटून' या दोन्ही नाटकातील तुझी भूमिका विनोदी आहे. पण या दोन्ही भूमिकातील वेगळेपण काय आहे?
- 'एका लग्नाची गोष्ट' हे नाटक वास्तववादी आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात घडणारी घटना आणि मग त्या आयुष्यात घडणार्या गंमती जमती यात सादर केल्या होत्या. तर 'आलटून पालटून' नाटकात सहसा सामान्यांच्या जीवनात न घडणारी गोष्ट दाखवण्याचा प्रयत्न विनोदी स्वरूपात केला आहे.
* विकास पाटील आणि प्रसाद ओक हे दोन्ही सहकलाकार या नाटकात तुमच्यासोबत आहेत ,त्यांच्या सोबतचा कामाचा अनुभव कसा होता?
- मुख्य म्हणजे ह्या नाटकातील कोणालाच इगो प्रॉब्लेम नाही. त्यामुळे हे नाटक एक टीम वर्क आहे. हे दोघेही खूप सपोर्टिव्ह आहेत. माझं, मी मोठा असं न करता आपल्या आयडिया आम्ही शेअर करत आलो आणि त्याचा परिणाम म्हणजे एक उत्तम नाटक तयार झालं.
* मालिका, चित्रपट आणि रंगभूमी अशा तिन्ही माध्यमांचा तुम्हाला अनुभव आहे, तर रंगभूमीविषयी तुम्ही काय सांगाल?
- प्रत्येक माध्यमात काम करताना आपल्याला स्वत:ची एक वेगळी बॉडी लॅग्वेज वापरावी लागते. माध्यमानुसार त्यात बदल करावे लागतात. सगळ्यात कठीण असतं ते रंगभूमीवर काम करणं. कारण तिथे रिटेक नसतो आणि जे घडणार ते प्रत्यक्ष पडद्यावर प्रेक्षकांच्या समोर, त्यामुळे सगळं वन शॉट मध्येच असतं. पण बाकीच्या माध्यमात आपल्याला रीटेक देता येतो. तरी ही प्रत्येक माध्यमाचं वेगवेगळं वैशिष्टय आहे. आणि त्यात काम करावं असं तुम्हाला वाटतं म्हणजे त्या प्रत्येक माध्यमात निश्चितच वेगळेपण आहे.
* या तिन्ही माध्यमांपैकी सगळ्यात जास्त कोणत्या माध्यमात तुम्हाला काम करायला आवडतं?
- मी रंगभूमीवर सगळ्यात जास्त काम केलं आहे. त्यामुळे मला रम्गभूमीवर काम करायला नेहमीच आवडतं. पण तरी मला जशी भूमिका मिळेल ती कशी आहे त्यावर माझ्या कामाचं माध्यम मला ठरवायला आवडेल.
* या नाटकाचं काय वैशिष्टय आहे असं तुम्हाला वाटतं?
- 'आलटून पालटून' हे नाटक म्हणजे एक हलकं फुलकं हसवणारं नाटक आहेच पण त्यातून एक संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे.
* या नाटकाच्या लेखनाबद्दल आणि दिग्दर्शनाबद्दल तुम्ही काय सांगाल?
- अभिराम भडकमकरांनी नाटक खूप सुंदर लिहिलं आहे. त्यामुळे नाटकाचा दर्जा आणि वेग याचा समतोल सांभाळण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी आणि समीरने केला आहे. समीर माझा चांगला मित्र आहे पण त्याच्याबरोबर काम करायची माझी इच्छा होती. त्यामुळे या नाटक बसवताना आमच्यातील अंडरस्टॅडींग लक्षात घेऊन समीरने त्याला हवं तसं काम आमच्याकडून करून घेतलं. समीर एक दिग्दर्शक म्हणून उत्तम आहेच. नुलतच 'नवा गडी नवा राज्य'साठी त्याने दिग्दर्शन केलं होतं.
* आत्तापर्यंत जे नाटकाचे प्रयोग झाले आहेत त्यांना मिळणारा प्रतिसाद कसा होता?
- आत्तापर्यंतच्या प्रत्येक प्रयोगाला उत्तम प्रतिसाद मिळाला. नाटकाला गर्दीही खूप झाली. पुन्हा पुन्हा नाटक बघायला आलेल्या प्रेक्षकांनी आवर्जून हे भेटून सांगितलं. अश प्रोत्साहनामुळे काम करण्याची प्रेरणा मिळते.
* आज रंगभूमीवर वेगवेगळे प्रयोग होत आहेत, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
- खरंच ही खूपच चांगली गोष्ट आहे की व्यावसायिक रंगभूमीवरही आता नवनवे प्रयोग होत आहेत. पण या प्रयोगांना तेवढाच प्रतिसाद प्रेक्षकांनी द्यावा ही माझी विनंती आहे.
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







