'आलटून पालटून'- समीर विद्वांसचं नवीन नाटक

Images: 

समीर विद्वांस हे नाव आज मराठी रंगभूमीवर गाजतंय. 'नवा गडी नवा राज्य' या नाटकाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. त्यानंतर आता लगेचच चंद्रवलयची निर्मिती असलेलं 'आलटून पालटून' हे नवं नाटक आता रंगभूमीवर येतंय. या नव्या नाटकाविषयी आणि त्याच्या प्रोसेसविषयी समीरने 'मम टीम'शी गप्पा मारल्या....

* 'नवा गडी नवा राज्य' या नाटकानंतर तुमचं नवीन नाटक रंगभूमीवर येतयं, त्यामुळे प्रेक्षकांच्या तुमच्याकडून अपेक्षा वाढल्या असतील.
- माझ्या पहिल्याच नाटकाला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे त्यांना नक्कीच माझ्याकडून अपेक्षा असणार. त्यामुळे त्यांच्या इच्छा पूर्ण करण्याचं दडपण आहे. शनिवारी म्हणजे २१ मेला नाटक ओपन होतंय. त्यामुळे थोडं टेन्शन आहे पण एक चांगलं नाटक करण्याचा मी पूर्णपणे प्रयत्न केला आहे.

* या नाटकाचं वैशिष्टय काय आहे?
- नाटकाचं वैशिष्टय एक नाही तर अनेक आहेत. प्रसाद ओक हा आजचा आघाडीचा कलाकार जो पाच वर्षानंतर रंगभूमीवर परत येतोय. अभिरामने आजवर खूप आशयघन नाटक लिहिली आहेत. त्यामध्ये 'देहभान', 'पाहुणा', 'स्थळ स्नेहमंदिर', 'ज्याचा त्याचा प्रश्न' अशी नाटकं लिहिली आहेत. त्याने एक वेगळं आणि थोडं ओपन फॉर्म असणारं कॉमेडी नाटक लिहिलं आहे. त्याचा विषय गंभीर आहे, फक्त त्याची मांडणी गंभीर न करता ती विनोदी पध्दतीने केलं आहे. हे आपल्याला आणखी एक वैशिष्टय म्हणता येईल. शिवाय चांगले कलाकार आहे, चंद्रवलयसारखं मोठं बॅनर आहे. त्यामुळे एक दर्जेदार कॉमेडी नाटक प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

* नाटकाच्या विषयाबद्दल तुम्ही काय सांगाल?
- आज पुरूष मेट्रोसेक्सशुअल झालाय असं म्हटलं जातयं, तसा तो खरंच झालाय का, त आज बायकोला एक व्यक्ती म्हणून स्थान देतोय पण हे सगळया पातळयांवर झालयं का, हे एका विशिष्ट वर्गापुरतं झालयं का याचा धांडोळा या नाटकातून घेतला आहे. समाजाची एक विशिष्ट चौकट असते त्याच्यावर काही परिणाम झालाय का हा विचारही या नाटकातून केला गेला आहे. स्त्रियांना दिलं जाणारं स्वातंत्र्य हे पुरूषाला वाटतंय तेवढचं दिलं जातय का हा असा गंभीर विषय विनोदी पध्दतीने मांडला गेलाय. त्यामुळे त्याचा परिणाम जास्त होतो.

* प्रसाद ओकबरोबर नाटकातली अनेक कलाकार मंडळी डेली सोपमधली आहेत त्यामुळे काही अडचण निर्माण झाली का?
- मला अतिशय आनंद आणि अभिमान वाटतो की सगळया कलाकारांनी त्यांच्या डेटस मॅनेज करून व्यवस्थित काम केलं. या कलाकारांनी मला सलग डेट्स दिल्या की आम्हाला नाटक करायचं आहे. त्यामुळे त्यांनी मला पूर्ण सपोर्ट केला. त्यामुळे मला नाटकाची तालीम करताना काहीही त्रास झाला नाही.

* तुम्ही आणि अभिराम दोघेही या पिढीतले असल्यामुळे हा विषय तुम्हाला सहज मांडता आला का?
- हो असं नक्कीच म्हणता येईल. आजची पिढी बंड करणारी म्हणून ओळखली जाते. त्या पिढीचे संस्कार त्यांच्या संसारात येणार त्यांच्या रिलेशनशीपमध्ये येणार. त्यामुळे जसं यापूर्वीचं नाटक मी रिलेट करू शकलो तसं हे नाटकही करू शकलो. हे नाटक एका विशिष्ट वयोगटासाठी नाही. एक स्त्री आणि एक पुरूष ज्यांना लग्न करायचं आहे, यासंदर्भात बोलणारं हे नाटक आहे. त्यामुळे हे नाटक नवीन पिढीला आवडेल.

* हे नाटक एका विशिष्ट लोकांपुरतं मर्यादित आहे असं नाही वाटत का?
- असं मुळीच नाही. ज्यांचं लग्न झालं आहे मी तर म्हणेन की ज्यांचं लग्न होऊन पाच-सात वर्ष झाले आहे त्यांचं हे नाटक आहे. मला वाटतं की ही एक वृत्ती आहे. पूर्वीच्या काळातही असे पुरूष होते की ज्यांनी आपल्या बायकोला पूर्ण स्वांतत्र्य दिलं होतं. आता हे प्रमाण वाढत जातयं. त्यामुळे हे नाटक त्या वृत्तीबद्दल बोलतं. '*

* आज मराठी रंगभूमीवर अनेक नवीन प्रयोग होताना दिसत आहेत, याविषयी तुम्हाला काय वाटत?
- आजची परिस्थिती फारच उत्तम आहे. आज 'वा!गुरू' सारखं नाटक असो किंवा' काटकोन त्रिकोण' असो किंवा' नवा गडी नवा राज्य' या प्रत्येक नाटकाची शैली खूप वेगळी आहे. तरी या सर्व नाटकांना लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. आजवर फक्त प्रायोगिक रंगभूमीवर नवीन विषय हाताळण्याची रिस्क घेतली जायची मात्र व्यावसायिक रंगभूमीवरही ती घेतली जात आहे. त्यामुळे लोक आले की नक्की नवीन प्रयोग होत राहतील आणि मग टिपिकल समीकरण बाजूला पडेल की लोकांना जे आवडतं ते आम्ही देतो वगैरे. त्यामुळे या परिस्थितीवर मी खुश आहे.

* या परिस्थितीचा एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला काही फायदा होतो का?
- नक्कीच त्याचा फायदा होतो. 'नवा गडी नवा राज्य'नंतर हे नाटक जेव्हा माझ्याकडे आलं तेव्हा मला पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं गेलं. बर्‍याचदा नवीन दिग्दर्शकाला ते दिलं जात नाही. नाटकाची एक चौकट असते त्या चौकटीत ते बसलं पाहिजे असं माझ्याबाबत मुळीच झालं नाही. संधी म्हणजे मला माझ्या पध्दतीने नाटक बसवू दिलं. उद्या माझम नाटक यशस्वी झालं तर मी एखादी कॉन्सेप्ट घेऊन निर्मात्याकडे गेलो तर ते माझ्यावर विश्वास दाखवतील, हे नक्की.