नव्या दमाची अभिनेत्री - धनश्री काडगांवकर
'गोडी गुलाबी','बायको पळाली माहेरी', 'नटसम्राट', 'आधी बसू मग बोलू' अशा नाटकातून आपल्यासमोर स्वत:च्या अभिनयाचा ठसा उमटवत तिने 'माझिया प्रियाला प्रीत कळॆना' या मालिकेतून छोटया पडदयावर पदार्पण केले. त्याच धनश्री काडगांवकर आता 'मोरया' या चित्रपटातून मोठया पडदयावर आपल्याला दिसणार आहेत. मोरया चित्रपटाच्या निमित्ताने तिच्याशी 'मम टीमने' मारलेल्या गप्पा......
* मोरया चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अवधूत गुप्ते यांच्यासोबत कामाचा अनुभव कसा होता?
- खूपच छान होता. अवधूतच्या आणि माझ्या पहिल्या भेटीत मी फारसं काही बोललेच नाही, पण त्याने स्वत:हून माझी या चित्रपटातील भूमिका काय आहे, चित्रपटाची कथा काय आहे, हे समजावून सांगितले. या त्यांच्या वागण्यामुळे मी या चित्रपटात काम करायला खूप कम्फर्टेबल झाले. त्याच्या मनात आणि डोक्यात त्याला काय करायचं आहे किंवा समोरच्याकडून काय काढून घ्यायचं आहे ते त्याच्या मनात स्पष्ट असतं. चित्रपट कोणत्या दिशेने जायला हवा हे त्याला पक्क माहीत असतं. तो उत्तम संगीतकार आणि गायक आहे हे आपल्याला माहितीच आहे. तसाच तो एक उत्तम दिग्दर्शकही आहे हे 'झेंडा'नंतर पुन्हा एकदा 'मोरया' या चित्रपटाने स्पष्ट होईलच.
* या चित्रपटातील भूमिका तुमच्याकडे कशी आली?
- माझं भरतनाटयममधे अरंगेत्रम झाल्यानंतर मी डान्सचे शो करायला लागले. एका नाटकातील भूमिकेसाठी तू जाऊन त्यांना भेटून ये असं माझ्या मित्रमैत्रिणींनी सांगितलं. मी त्या ठिकाणी फोन केला तर त्यांना माझा आवाज आवडला. म्हणून मला त्यांनी भेटायला बोलावलं. माझी व्यावसायिक नाटकापासून सुरूवात झाली.
आंतरमहाविदयालयीन नाटकात मी कामं केली आहेत. मग 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' मधे शेवटच्या राऊंडमधे पहिल्या पाचात आले. 'माझिया प्रियाला प्रीत कळेना' ह्या पहिल्या मालिकेत मी काम केलं आणि आता चित्रपटसृष्टीतील माझा श्रीगणेशा 'मोरया' या चित्रपटाने होत आहे. यावेळी मला एक एसएमएस आला. मी त्यानंबरला फोन केला तर कळलं की मोरयाच्या ऑडिशनसाठीचा तो मेसेज होता. पण मला ते म्हणाले तू येऊन तर जा. मी तिथे गेले आणि माझी व्यवस्थित ऑडिशन झाली आणि मला या चित्रपटासाठी निवडलं गेलं.

* नाटक, मालिका आणि चित्रपट ह्या तिन्ही माध्यमात साधारण सारख्याच कालावधीत तू काम केलं आहेस तर या तिन्ही माध्यमातील तूला जाणवलेला फरक कोणता?
- मालिकेत काम करताना रोज शुटिंगला जावं लागतं. दिग्दर्शकावर खूपच प्रेशर असतं, कारण दिवसभरात मालिकेच्या एका भागाची चोवीस मिनिटं त्याला शुट करायची असतात. त्या प्रेशरमुळे दिग्दर्शक आणि कलाकार एकमेकांना त्या भूमिकेसाठी तेवढा वेळ देऊ शकत नाहीत. हे कसं चांगलं होईल, वाटेल यासाठी विविध गोष्टी प्रयोग करून बघायला वेळचं नसतो. पण तोच चित्रपटाबद्दलचा माझा अनुभव खूप चांगला आहे. अवधूतला नक्की माहिती असतं की हा शॉट चित्रपटात कसा झाला पाहिजे. त्यामुळे कलाकारांकडून कसं काम करून घ्यायचं ते त्याला बरोबर कळायचं. नाटकाबाबतीत म्हटलं तर आपण असे अनेक प्रयोग हमखास करून पाहत असतो.
* चित्रपटातील तुझी भूमिका काय आहे?
- यात माझी भूमिका एका साध्या, सरळ मुलीची आहे. मी संतोषच्या बहिणीची भूमिका यात करत आहे. माझी भूमिका म्हणजे अनेक मध्यमवर्गीय मुलींचे नेतृत्त्व करणारी ती आहे. चाळ संस्कृतीत वाढलेली आहे. बहिण भावाच्या प्रेमाच्या नात्याबद्दल सांगणारी ही भूमिका आहे.
* इतर सहकलाकारांसोबत असलेल्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगशील?
- सहकलाकारांबद्दल केमिस्ट्री चांगली जमली ना तर आपल्याला काम करायला खूप मजा येते. या शुटिंगच्या दरम्यान मला अशीच खूप मजा आली. आमची सगळयाच कलाकारांची केमिस्ट्री छान जमली होती. संतोष मी आणि स्पृहाने तर खूप धमाल केली होती. एक दिवस आमचा सकाळी एकच शॉट होता आणि मग उर्मिलाच्या गाण्याचं शुटिंग होतं. आमचा शॉट झाला नंतर आम्ही तिघं व्हॅनिटी व्हॅनमधे बसून पत्ते खेळलो. संतोषने आम्हा दोघींना तीन पत्ती कशी खेळायची ते शिकवलं होतं. मी तर कधीच हे खेळले नव्हते. त्यामुळे मला तर अजूनच मजा आली. तो अनुभवच खूप वेगळा होता.
आम्ही तिघांनी खूप मजा केली. खूपच छान टयुनिंग जमलं होतं. विमल म्हात्रेंबरोबर सुध्दा काम करताना खूप छान शिकता आलं. त्या मला स्वत:हून सांगायच्या तू हे असं करून बघं किंवा असं कर तर चांगलं वाटेल. त्यामुळे खूप छोटया गोष्टीतून खूप चांगलं शिकता आलं. दिलीप प्रभावळकर यांच्याबरोबर ही काम करण्याची मजाच वेगळी होती. शीतल शुक्लबरोबर तर मी एका मालिकेत काम करत आहे. त्यात तिने माझ्या आजीचे काम केले आहे. त्यामुळे आमच्यात तर खूप छान बॉडिंग आहे.
* या चित्रपटाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?
- हा माझा पहिला चित्रपट असल्यामुळे मला खूप अपेक्षा आहेत या चित्रपटाकडून. मी असं म्हणणार नाही की माझी या चित्रपटात खूप मोठी भूमिका आहे. पण जेवढा माझा रोल होता त्यात मी माझ्याकडून बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यातील माझं काम बघून मला नक्कीच नव्या ऑफर येतील अशी मी अपेक्षा करते.
* भरतनाटयम नृत्य की अभिनयापैकी तू कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं ठरवलं आहेस?
- मी अभिनयात करिअर करायचं ठरवलं आहे. पण वर्षभर आधी मला या दोन्हीतील करिअर म्हणून काय निवडावं हा प्रश्न पडायचा. पण माझी कॉलेजची परीक्षा संपायला आणि इथे या क्षेत्रात माझं काम सुरू व्हायला तेव्हाच सुरूवात झाली. जसं माझ्याकडे काम येत गेलं तसं मी करत गेले. जरी नृत्य हे माझं पहिलं प्रेम आहे तरी या क्षेत्रात माझं काम लोकांना आवडतयं आणि मलाही इथे गती दिसत आहे. म्हणून मी अभिनयात करिअर करायचं ठरवलं आहे.
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







