'मोरया'तली रिपोर्टर - परी तेलंग

Images: 

साम टीव्हीवरील 'सुगरण' तसंच 'मोगरा फुलला'या कार्यक्रमांचं निवेदन करणारी 'मी मराठी'वरील 'कन्यादान'मालिकेमुळे परी तेलंग आपल्याला नियमित भेटत असते. अवधूत गुप्तेच्या 'मोरया'या आगामी चित्रपटात परी तेलंग एका रिपोर्टरच्या भूमिकेत काम करते आहे. तिच्या भूमिकेविषयी 'मम टीमशी'तिने संवाद साधला...

* या चित्रपटातील भूमिका तुझ्याकडे कशी आली?

- मला 'मोरया' चित्रपटातील रिपोर्टरच्या भूमिकेसाठी ऑडिशनचा फोन आला होता. मी जाऊन रीतसर ऑडिशन दिली. त्यानंतर दोन दिवसांनी शुटिंग सुरू होणार होतं. मला दोन दिवसात काही फोन आला नाही. मला वाटलं की त्यांनी दुसर्‍या कोणाला तरी सिलेक्ट केलं. पण दुसर्‍याच दिवशी मला विशालचा फोन आला तू गिरगावला येतेस का? अवधूतला भेटायला आणि पुन्हा एकदा ऑडिशन दयायला ये. त्या दिवशी भारत-पाकिस्तान मॅच होती म्हणून सगळीकडे बंद होतं. त्यामुळे माझी शुट डेट कॅन्सल झाली होती.
त्यामुळे मी 'मोरयाच्या' सेटवर गेले. आमची बोलणी झाली, मी या चित्रपटात काम करणार असं ठरलं. तिथे हेमंत कुलकर्णी आले ते म्हणाले झालं बोलून चल मेकअपला बस. मी थक्क होऊन बघत बसले. मी त्यांना सांगितलं की मी त्यासाठी ड्रेस आणलेला नाही. पण योगायोग असा की माझ्या भूमिकेसाठी जो ड्रेस त्यांनी ठरवला होता तोच मी घालून गेले होते. ते म्हणाले हाच ड्रेस परफेक्ट आहे. सगळेच जणं म्हणतं होते की हा रोल तुझ्यासाठीच आहे. 'इट वॉज रिटन फॉर यु' असं सगळे म्हणाले. कारण इतक्या मुलींची ऑडीशन घेतली होती की एकदा सगळे चिन्मयला म्हणाले की तू तुझी हिरॉईन घेऊन ये. मलाच विश्वास बसत नव्हता, ऑडिशनला गेलेली मी आणि माझी चित्रपटासाठी निवड झाली आणि मी एक सीन पूर्ण करून घरी परतले.

* चित्रपटातील तुझी भूमिका काय आहे?

- या चित्रपटात माझी भूमिका रिपोर्टरची आहे. चिन्मय आणि संतोषच्या गटात वैर असतं. पण मी चिन्मयला सपोर्ट करणारी आहे. त्यामुळे माझ्याबरोबर चिन्मय आहे. त्याच्याबद्दल मी लाईट इन्व्हॉल्व्ह झाली आहे. म्हणून मी रिपोर्टर असले तरी त्याला सपोर्ट करणारी आहे.

* तुझ्या इतर भूमिकांपैकी या भूमिकेचं वेगळेपण काय सांगशील?

- चित्रपटात मी पहिल्यांदाच रिपोर्टरचं काम केलं आहे. त्यामुळे मला एक तर रिपोर्टरसारखं भरभर बोलायची सवय नाही. त्यामुळे पहिल्या शॉटला जरा एकदोनदा फंबल झालं. पण नंतर मात्र काम करताना मजा आली. संपूर्ण चित्रपटच इतक्या डिटेलिंगने, मोठया स्केलवर, छोटया छोटया गोष्टींवर लक्ष देऊन केलेला आहे. कास्टिंग, गाणी या सगळयामुळे चित्रपट खूप छान झाला आहे. चित्रपट पाहून बाहेर पडताना प्रेक्षक नक्कीच काहीतरी विचार घेऊन बाहेर पडतो.

* या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अवधूत गुप्ते यांच्यासोबत कामाचा अनुभव कसा होता?

- खूपच छान अनुभव होता. एक तर मोठया नावाखाली मला काम करता आलं. एखादा शॉट ओके झाला की अवधूत खूप खूश व्हायचा. सगळयांना तसचं चांगलं काम केलं असही म्हणायचा. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मेमोरेबेल एक्सपिरिअन्स होता.

* इतर सहकलाकारांसोबत असलेल्या केमिस्ट्रीबद्दल काय सांगशील?

- माझे बरेचसे सीन चिन्मय आणि मॉबबरोबरचे होते. मी चिन्मयबरोबर पहिल्यांदाच काम केलं. मी खूप लहान असल्यापासून चिन्मयने मला पाहिलेले आहे. त्यामुळे त्याच्याबरोबर काम करताना टेन्शन नव्हतं. मालिकेचं शुटिंग करताना आम्हाला अख्खा दिवस काम होतं. पण चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान मात्र एक शॉट झाला की बसं असं सगळे करत होते. मला असं वाटायचं की आपण हे काय करतोय, आपल्याला काहीच काम नाही. मग चिन्मय मला म्हणाला की तू टेन्शन घेऊ नकोस हा चित्रपट आहे. सुरूवातीला मला ही असचं वाटायचं. पण इथे प्रत्येक गोष्टीचे बारकावे लक्षात घेऊन विचारपूर्वक काम केलं गेलं. त्यामुळे हा माझा खूप छान अनुभव होता.

Dsc_0015_1.jpg
* या चित्रपटाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?

- अपेक्षा खूप आहेत. गणेशोत्सवाच्या दरम्यान हा चित्रपट प्रदर्शितही होत आहे. हा चित्रपट गणपती आणि गणेशोत्सवावर आहे. गणपती महाराष्ट्राचे दैवत आहे. त्यामुळे हा चित्रपट नक्की बघितला जाईलचं. तो तितक्या चांगल्या दर्जाचा झाला आहे. या चित्रपटाबद्दल मलाही खूप उत्सुकता आहे.

* तुझे आगामी प्रोजेक्ट कोणते आहेत?

- सध्या मी सुगरण आणि मोगरा फुलला ह्या दोन कार्यक्रमांचे निवेदन करते. 'कन्यादान' ही मालिका सध्या करत आहे.