' रंगभूमी एक उत्तम प्रोसेस' - विकास पाटील

Images: 

विकास पाटील हे नाव मालिकाविश्वात नवीन नाही. 'चार दिवस सासूचे'या लोकप्रिय मालिकेत 'शुभम'ही व्यक्तिरेखा सर्वांची लाडकी आहे. नुकताच प्रदर्शित झालेला
'व्हेकेशन' या चित्रपटात ही त्याची मध्यवर्ती भूमिका होती. सुनील बर्वेच्या 'हर्बेरिअम'उपक्रमांतर्गत 'हमिदाबाईची कोठी' या नाटकात त्याची भूमिका सगळयांच्याच लक्षात राहिली. तर चंद्रवलय संस्थेतर्फे नुकतचं रंगभूमीवर आलेलं 'आलटून पालटून' या नाटकात त्याच्या अभिनयाचं कौतुक होतंय. 'आलटून पालटून' हे नाटक त्याचं पहिलं व्यावसायिक नाटक. या नाटकाच्या संदर्भात विकास पाटीलने 'मम टीम'शी मनमोकळा संवाद साधला.

* अभिराम भडकमकर यांनी लिहिलेलं हे नाटक ओपन फॉर्मचं आहे, ही एक फँटसी आहे तर याविषयी तुम्ही काय सांगाल?
- जेव्हा मी पहिल्यांदा हे नाटक वाचलं तेव्हा मी खूप एक्साईट झालो होतो. अशा प्रकारचं नाटक आणि या विषयाला दिलेली ट्रिटमेंट खूप वेगळी होती. मूळात एक बायको आणि दोन नवरे तसंच 'सवता' ही कॉन्सेप्ट प्रेक्षकांनी स्वीकारणं खूप आव्हान होतं. आजवर प्रेमाचा त्रिकोण या विषयावर अनेक मालिका, चित्रपट, नाटक येऊन गेलेत. मात्र असा विषय यापूर्वी हाताळला गेला नाही. एक वेगळया विषयाबरोबरच विष्णु आणि पार्वती हे जे कॅरॅक्टर्स आहेत, त्यांचा रोल या सगळया गोष्टी नाटकात अफलातून आहेत. अभिरामने ज्या पध्दतीने लिहिलं होतं त्यामुळे नाटकात जे दाखवलं गेलं आहे ते लोक डायजेस्ट करू शकले.

* प्रसाद ओक आणि सुजाता जोशी या कलाकारांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- प्रसाद ओक जरी पाच वर्षांनी कमबॅक करत असला तरी यापूर्वी त्याने नाटकात काम केलं होतं. सुजाता जोशीनेही यापूर्वी अनेक चांगल्या नाटकात काम केलं आहे. मी यापूर्वी काही प्रायोगिक नाटकांमध्ये काम केलं होतं. त्यामुळे एक रेग्युलर फ्रेश व्यावसायिक असं हे माझं पहिलं नाटक होतं. त्यात एवढे चांगले सहकलाकार ,समीरसारखा दिग्दर्शक ज्याने नुकतचं 'नवा गडी नवा राज्य'सारखं नाटक दिग्दर्शित केलं होतं. 'चंद्रवलय'सारखी निर्मितीसंस्था होती की जिने आजवर अनेक दर्जेदार नाटक रंगभूमीवर आणली आहेत. अभिरामसारख्या लेखकाचं नाटक मला वाटतं एका कलाकाराला यापेक्षा दुसरं काय हवं असतं. या सगळयांकडून मला खूप शिकायला मिळालं.

* 'आलटून पालटून' नाटक खूप उत्तम लेखन केलेलं नाटक आहे, त्याविषयी तुम्ही काय सांगाल?
- अभिरामने यापूर्वीच त्याच्या लेखनाची ताकद सिध्द केली आहे. हे एक वेगळया प्रकारचं नाटक त्याने लिहिलं आहे. एका उत्तम लेखकाची खासियत असते की तो सगळया प्रकारचे फॉर्म चांगल्या पध्दतीने हाताळू शकतो. हे सगळं अभिराममध्ये आहे. या नाटकात असा एक प्रसंग आहे की तेव्हा असं कळतं की मानव मरणार नाहीये. तेव्हा गार्गीचा म्हणजे सुजाताचा दुसरा नवरा तिचं दुसर्‍या नवर्‍यासोबतचं हनिमुन तसा हा गंभीर विषय. अशा विषयांवर बाहेर आपण बोलू सुध्दा शकत नाही. पण इथेच खरी गंमत आहे, बायको आपल्या दुसर्‍या नवर्‍याबरोबर हनिमुन करते आणि पहिल्या नवर्‍याला सांगते की तुझं नाईट शोचं तिकिट आहे, तू त्या शोला जातो. हा प्रसंग प्रेक्षक स्वीकारतात एवढंच नाही तर तो एन्जॉयही करतात. हीच अभिरामच्या लेखनाची ताकद आहे.

* समीर विद्वांसचं हे दुसरं नाटक आहे, तुम्ही सर्वांनीच या विषयाला योग्य न्याय दिलात.
- हो नक्कीच मला असं वाटतं, मी जेव्हा हे नाटक वाचलं तेव्हा माझ्या डोक्यात पहिला प्रश्न हा होता की हे नाटक डिरेक्ट कोण करणार, कारण हे नाटक ज्या जॉनरचं आहे तो माणूसही त्या थॉट प्रोसेसचा हवा. हे नाटक वाचल्यानंतर ते मांडायचं कसं, लोकांपर्यंत पोहोचवयाचं कसं हे त्याच्या डोक्यात क्लिअर होतं. तुम्ही नाटक पाहिलतं तर तुम्हाला कळेल की संपूर्ण नाटकाला एक फ्रेश फ्लेवर आहे. तसंच हे नाटक जर एखाद्या ज्येष्ठ दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलं असतं तर त्याची ट्रिटमेंट वेगळी असली असती.

* आजवर तुम्ही मालिका,चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलं आहे तर सगळयात कम्फर्ट लेव्हल तुम्हाला कुठे वाटते?
- मूळात कम्फर्ट लेव्हल तयार होण्यासाठी त्या माध्यमात तुम्ही काही काळ काम करण्याची आवश्यकता असते. मी काही प्रायोगिक नाटकांमध्ये यापूर्वी काम केली होती. नाटकाला ना एक प्रोसेस असते. तालीम करताना तुमच्यात एक आत्मविश्वास येतो. त्यामुले मला मालिका आणि चित्रपटांपेक्षा नाटकात काम करताना जास्त कम्फर्ट फील होतं.

* या नाटकाचे आत्तापर्यंत पंधरा प्रयोग झाले आहेत, या प्रयोगांना मिळणारा प्रतिसाद कसा होता?
- आजवर मिळालेला प्रतिसाद खूपच छान होता. प्रत्येक नाटकाच्या सुरूवातीला एक हूरहूर असते. तशी ती या नाटकाच्या वेळेसही होती. त्यात हा विषय वेगळा होता. काही ठिकाणी आपल्याला माहीत असतं की त्या ठिकाणी दाद मिळणारच पण ज्या ठिकाणी अपेक्षा नव्हती त्याठिकाणीही प्रेक्षकांची दाद मिळत होती. फक्त आमचे आजवर पंधरा प्रयोग झाले आहेत तरी काही फॅमिली आम्हाला अशा भेटल्या की त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही पुन्हा हे नाटक पाहणार आहोत, हेच नाटकाचं यश असतं.

* मराठी रंगभूमीच्या आजच्या परिस्थितीबद्दल तुम्हाला काय वाटतं?
- आत्ताची परिस्थिती नाटकासाठी खूप उत्तम आहे. माझ्यासारख्या कलाकारासाठी हे खूप चांगलं आहे. म्हणजे मला नाटकात काम करायचं आहे. आणि मी माझ्या मालिका, चित्रपट सांभाळून हे करू शकतोय. हे केवळ कलाकारांसाठीच नाही तर लेखक,दिग्दर्शक निर्मात्यांसाठीसुध्दा हे वातावरण खूप पूरक आहे. रंगभूमीवर असे खूप चांगले प्रयोग होत आहेत, ते असेच होत राहो, असंच मला वाटतं.
मी आजवर मालिका, चित्रपटात काम केलं मात्र मला नाटकातून जो प्रतिसाद मिळाला तो कशातूनही मिळाला नाही. एका अभिनेत्याला प्रेक्षकांनी स्वीकारणं ही प्रोसेस नाटकातून उत्तम होते, असं मला वाटतं. प्रेक्षकांनी सातत्याने सगळया प्रयोगांना प्रतिसाद द्यावा असं मला वाटतं.