लग्नसंस्थेवरील विनोदी मार्मिक टिप्पणी - संतोष काणेकर
'चंद्रवलय' संस्थेतर्फे 'आलटून पालटून' हे नाटक रंगभूमीवर येतंय . दिनू पेडणेकर, मृणाल देशपांडे आणि संतोष काणेकर यांनी हे नाटक रंगभूमीवर आणलयं. या नाटकासंदर्भात काणेकरांनी 'मम'टीमशी संवाद साधला.
* या विषयावरचं नाटक रंगभूमीवर घेऊन यावं असं तुमच्या निर्मितीसंस्थेला का वाटल?
- फक्त विनोदी नाटक रंगभूमीवर आणण्यात आज कुठल्याही निर्मात्याला स्वारस्य नाही. आज खूप ट्रेंडस बदलले आहेत. हिलेरिअस आणि सिच्युऐशनल कॉमेडी पाहण्याबरोबरच संवादातली गंमतही लोकांना आवडते. लेखकाने ज्या पध्दतीने या नाटकाचं लेखन केलं आहे त्यात ह्युमरस भाग खूप आहे. एक खूप वेगळया जातकुळीचा हा विषय आहे. गंभीर विषय हसवत हसवत तुम्हाला या नाटकातून खूप काही देऊन जातो.
* नाटकाचं दिग्दर्शन आणि लेखन याबाबत तुम्ही काय सांगाल?
- अभिरामनं यापूर्वी खूप चांगली नाटकं लिहिली आहेत. 'देहभान','पाहुणा','स्थळ स्नेहमंदिर' या आशयघन नाटकाबरोबरच हे त्याच्या लेखनीतून उतरलेलं उत्तम नाटक आहे. लेखकाचा त्याच्या शैलीचा म्हणून एक चाहतावर्ग असतो तसा त्याचा आहे.
समीरबद्दल बोलायचं झाल्यास त्याचं नुकतचं 'नवा गडी नवा राज्य' हे नाटक रंगभूमीवर आलं आहे. अजूनही त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या नाटकाने त्याला एक सक्षम दिग्दर्शक म्हणून ओळख मिळवून दिली आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास होता. आणि चांगलं लेखन असलेलं नाटक जर त्याच्याकडे आलं तर तो चांगलं दिग्दर्शन करेल असं वाटलं.
* दिग्दर्शक आणि लेखक हे आजच्या पिढीचे असल्यामुळे ते प्रेक्षकांशी, विषयाशी आणि सहकलाकाराशी योग्य पध्दतीने रिलेट करू शकतात असं तुम्हाला वाटतं का?
- नक्कीच ते रिलेट करू शकतात कारण हा विषय आजच्या प्रेक्षकांचा आहे. युथचा आहे. ज्यांचं लग्न झालं आहे किंवा होणार आहे, अशा दोन्ही वर्गांना हे नाटक अपील होईल . एका विशिष्ट वर्गातल्या लोकांनी ते पाहावं असं काही नाही. तर सर्व वर्गातल्या प्रेक्षकांना हे नाटक अपील होईल.
* एका ओळीत या नाटकाचं वैशिष्टय तुम्ही काय सांगाल?
- लग्नसंस्थेवर विनोदी पद्धतीनं मार्मिक भाष्य करणारं हे नाटक आहे.
* नाटकाच्या विषयाबद्दल तुम्ही काय सांगाल?-
एकाचं लग्न झालं आहे आणि ज्याचं लग्न झालेलं नाही अशा दोघांच्या मानसिकतेवर भाष्य करणारं हे नाटक आहे. आजचा पुरूष मेट्रोसेक्सशुअल झाला आहे का, त्याचा प्रॉब्लेम काय आहे, तसा तो खरंच झालाय का याविषयाचा धांडोळा या नाटकात घेतला गेला आहे.
* नाटकात डेली सोपमध्ये काम करणारी मंडळी आहेत, त्यांच्या डेट्सचा काही त्रास झाला का?
- असा कुठलाही त्रास झाला नाही. प्रसाद जरी मालिका आणि चित्रपट करत असला तरी तो मूळ रंगभूमीवर काम करणारा कलाकार आहे. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे मालिका आणि चित्रपटात काम करत असले तरी या कलाकारांचं पहिलं प्रेम नाटकावर आहे. तसचं नाटकात तुम्हाला तात्काळ प्रतिसाद मिळतो जो मालिका आणि चित्रपटातून मिळत नाही. तसंच मालिका आणि चित्रपटांची चर्चा काही काळापुरती मर्यादित राहते मात्र नाटकाचे प्रयोग असेपर्यंत त्याची चर्चा सुरू राहते. त्यामुळे नाटक हे नटासाठी खूप महत्वाचं असतं.
* आज मराठी रंगभूमीवर वेगवेगळ प्रयोग होताना दिसत आहेत, या परिस्थितीविषयी तुम्हाला काय वाटतं?
- मी म्हणेन की रंगभूमीची परिस्थिती खूप उत्तम आहे. जर अशीच परिस्थिती कायम राहिली तर रंगभूमीला चांगले दिवस येतील.
* अशा चांगल्या परिस्थितीचा एक निर्माता म्हणून तुम्हाला उपयोग होतो का?
- नक्कीच होतो. असं एखादं नाटक जे सादरीकरणात उत्तम आहे, लेखनात चांगलं आहे हा विश्वास निर्मात्यासाठी खूप महत्वाचा असतो. चंद्रवलयने यापूर्वी 'बाजीराव मस्तानी' सारखं नाटक केलं आहे. दिनू पेडणेकरांची 'अनामिका' नावाची संस्था आहे. माझी स्वत:ची संस्था आहे. आमच्या नावाभोवती वलय आहे असं मी म्हणणार नाही. पण लोकांचा एक विश्वास असतो की हे निर्माते म्हणजे चांगलं नाटक आपल्याला पाहायला मिळणार . तेव्हा सातत्याने हा विचार नेहमी असतो की काहीतरी नवीन, वेगळं प्रेक्षकांना द्यायला हवं.
आपला आगमन क्रमांक आहे
फिरोदिया विशेष ब्लॉग्स
आजचा वाढदिवस







