सशक्त अभिनेत्री - विमल म्हात्रे

Images: 

'गोलपिठा', 'रंग्या रंगीला रे', 'आयला हो रे', 'आम्ही आलो रे, 'चारचौघांच्या साक्षीने', 'रात्र आरंभ', 'अगं बाई अरेच्चा', 'धुडगूस', 'वरचा क्लास', 'रूणूझुणू' अशा विविध नाटक, चित्रपट आणि मालिकांमधून स्वत:च्या अभिनयाची ओळख लोकांना करून देणार्‍या आणि पुन्हा एकदा 'मोरया' या चित्रपटातून आपल्या समोर येणार्‍या विमल म्हात्रे. त्यांची ओळख मोरयाच्या निमित्ताने करून घेताना त्यांच्याशी साधलेला संवाद.....

* या चित्रपटातील भूमिका तुमच्याकडे कशी आली?

- 'अगं बाई अरेच्चा' चित्रपटाच्यावेळी राहूल दादा आणि मी एकत्र काम केलं आहे. राहुल दादांनी माझं नाव या चित्रपटासाठी सुचवलं. मला सुध्दा एकदा तरी अवधूत गुप्तेंच्या निर्मितीसंस्थेत काम करायची इच्छा होती. चांगलं प्रॉडक्शन, चांगल्या माणसांबरोबर काम करायला नेहमीच मजा येते, तो एक वेगळा अनुभव असतो. त्यामुळे मी पण या भूमिकेसाठी होकारच दिला.

* चित्रपटातील तुमची भूमिका काय आहे? इतर चित्रपटांपेक्षा या भूमिकेचं वेगळेपण काय सांगाल?

- 'मोरया' चित्रपटात संतोष जुवेकर आणि धनश्री काडगांवकरच्या आईचं पात्र मी साकारत आहे. खूप मोठा रोल नाही. एक मध्यम वर्गीय चाळीतील ही आई. माझे दोन ते तीन सीन आहेत पण आईच्या कजाग वागण्याचं कारण त्यातून स्पष्ट होताना दिसतं. कारण असतं घरातील गरिबीची परिस्थिती, शिवणकाम करून ती घर चालवत असते. अशा परिस्थितीत आपल्या मुलांनी सरळ मार्गाने जीवन जगावं अशी तिची इच्छा असते. त्यासाठी ती मुलांवर चिडते, रागावते. पण त्याच्यामागे त्यांचं चांगलं व्हावं ही तिची प्रेमभावना असते. खूप लहान पण खूप छान पात्र आहे. 'अगं बाई अरेच्चा' चित्रपटातील आई अगदी मवाळ, सगळयांना सांभाळून घेणारी, प्रेमळ असते. त्या अनुषंगाने यातील आई रागावणारी आहे. पण शेवटी प्रत्येकवेळी आई ही आई असते. इथेही तिच्या रागामागे प्रेम असते पण ते सांगता येत नाही त्यामुळे ती मुलांवर सारखी चिडत असते. पण हेतू हा, मुलांनी चांगल्याप्रकारे नोकरी करुन जीवन मार्गाला लागावं.

* या चित्रपटाचे दिग्दर्शक आणि निर्माते अवधूत गुप्ते यांच्यासोबत कामाचा अनुभव कसा होता?

- अतिशय उत्तम अनुभव होता. कामाच्या, शुटिंगच्या वेळी कधीच टेन्शन जाणवलं नाही. त्यांनी आमच्या पहिल्याच भेटीत मला असं जाणवून दिलं की 'आय अ‍ॅम अ‍ॅट होम' माझ्या डबींगच्या वेळेला मला त्यांनी खूप छान टिप्स दिल्या. मी आत्तापर्यंत इतक्यावेळा डबिंग केलं आहे पण अवधूतने सांगितलेल्या बर्‍याच गोष्टींमुळे मला नवीन शिकायला मिळालं. चित्रपटात काम करताना नेहमी मला नवीन आणि चांगलं शिकण्याची इच्छा असते. दिग्दर्शक काय सांगतात, याकडे माझं लक्ष असतं. दिग्दर्शक हा आपला गुरू असतो. तो वयाने लहान असला तरी तो काही महत्त्वाचं सांगत असेल आणि त्यातून मला काही शिकायला मिळत असेल तर मला त्यात काहीच कमीपणा वाटतं नाही. अवधूत आणि सगळयाच प्रॉडक्शन हाऊसकडून मला खूप सहकार्य मिळालं. माझी अवधूतच्याबरोबर काम करण्याची इच्छा पूर्ण झाली.

* इतर सहकलाकारांसोबत असलेल्या केमिस्ट्रिबद्दल काय सांगाल?

- उत्तमच. संतोष आणि धनश्री ही दोन माझी मुलं आहेत. त्यांच्याबरोबर आणि गणेश यादवांबरोबर माझे सीन आहेत आणि बाकीचे मॉबमधे आहेत. खूपच छान सगळयांनी उमजून, समजून, एकमेकांना सहकार्य केलं. असं वाटलंच नाही मी चित्रपटात काम करत आहे. हेमेंद्र कुलकर्णींनी सुध्दा छान सगळयांना आम्हाला सांभाळून घेतलं.

* या चित्रपटाकडून तुमच्या काय अपेक्षा आहेत?

- चित्रपट खूप छान चालावा, लोकांच्या पसंतीला यावा. लोकांनी चित्रपटगृहात येऊन चित्रपट बघावा. जेणे करून दिग्दर्शकाने, कलाकारांनी, कॅमेरामननी, पडदयामागच्या सर्व कलाकार, सहकार्यांनी हा चित्रपट करायला किती मेहनत घेतली आहे ते लोकांना कळेल. एक चांगली कलाकृती लोकांना पाहण्याची जणू संधीच मिळेल.

* तुमचे आगामी प्रोजेक्टस कोणते आहेत?

- माझे आगामी तीन चित्रपट येत आहेत. एक आहे अरूण नलावडेंचा 'वारसा' , दुसरा राजेश देशपांडेंचा 'आया सावन झूम के' आणि एक रामगोपाल वर्मांचा हिंदी चित्रपट आहे 'शबरी' तसेच अजून काही प्रोजेक्ट चर्चेत आहेत.