विनोदी आणि अंतर्मुख करायला लावणारा 'गाजराची पुंगी' मराठी चित्रपट

विनोदी आणि अंतर्मुख करायला लावणारा 'गाजराची पुंगी' मराठी चित्रपट

विनोदातून मनोरंजन आणि अंतर्मुख करायला लावणारे अनेक विषय मराठी चित्रपटसृष्टीत आज हाताळले जात आहेत. असाच एक प्रयोग निर्माते सुनील फडतरे आणि दिग्दर्शक तानाजी घाडगे यांच्या आगामी 'गाजराची पुंगी'या विनोदी चित्रपटात दाखवला गेला आहे. दिग्दर्शक तानाजी घाडगे यांनी 'कोण आहे रे तिकडे','बायको उडाली भुर्र'या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. आगामी'गाजराची पुंगी'या मराठी चित्रपटातून असाच एक विचार मांडण्यात आला आहे. या चित्रपटाची कथा-पटकथा आणि संवाद लेखक अरविंद जगताप यांचे आहेत. तर संगीत लोकप्रिय संगीतकार चिनार-महेश यांचे आहे.
एका खेडेगांवात शुटिंगच्या निमित्ताने सगळी टीम येते. या एका प्रसंगातून खेड्यातल्या गावकर्‍यांना शुटिंगबद्दल वाटणारं आकर्षण,त्यातून घडणार्‍या गमतीजमती म्हणजे 'गाजराची पुंगी'हा आगामी मराठी विनोदी चित्रपट. एक हलकाफुलका आणि विनोदी चित्रपट यानिमित्ताने निर्माते सुनील फडतरे घेऊन आले आहेत. तानाजी घाडगे दिग्दर्शित 'गाजराची पुंगी'या चित्रपटात सुबोध भावे, प्रसाद ओक, मंगेश देसाई, सई ताम्हणकर, विनय आपटे, भारत गणेशपुरे, अरूण कदम, अभिजीत चव्हाण, किशोर चौगुले, सुश्रुत मंकणी, गौरी कुलकर्णी आणि विशाखा सुभेदार या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.