'स्वप्न तुझे नी माझे' - मैत्रीची कहाणी

'स्वप्न तुझे नी माझे' - मैत्रीची कहाणी

मैत्रीची व्याखा शब्दात व्यक्त करणं अवघड आहे. मैत्री म्हणजे एकमेंकावरचा आश्वासक. मैत्री प्रत्येकाच्या आयुष्यात खास असते. मैत्रीच्या अशाच हळूवार नात्यातला चढ-उतार रेखाटणारा 'स्वप्न तुझे नी माझे' हा चित्रपट लवकरच येत आहे. 'नामदेव उमाजी सिने आर्टस प्रस्तुत' या चित्रपटाची निर्मिती सचिन भालिंगे यांनी केली असून संकल्पना त्यांचीच आहे. तर अशोक कांबळी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाचे मुख्य आकर्षण म्हणजे शंकर महादेवन यांचा मुलगा सिध्दार्थ महादेवन याने या चित्रपटाचं संगीत दिग्दर्शन आणि गायक म्हणूनही त्याचं या चित्रपटाव्दारे पदार्पण होत आहे. तर भाचा सौमिल संगीतकार म्हणून पदार्पण करत आहे. या चित्रपटात एकूण पाच गाणी असून ती मनोज यादव यांनी लिहिली आहेत. सिध्दार्थ आणि सौमिलशिवाय चित्रपटातील गाणी राहूल वैदय, श्रेया घोषाल, शंकर महादेवन, सोनू कक्कड यांनी गायिले आहेत.
'स्वप्न तुझे नी माझे'ही कथा आहे विश्वास आणि विदयाधर या दोन मित्रांच्या अतुट नात्याची, विश्वासाची. शेतकी महाविदयालयातल्या शिक्षणानंतर श्रीमंत घरातील विदयाधरला दुष्काळी भागात नंदनवन फुलवायचे आहे. तर गरीब घरातील विश्वासला गावाचा उध्दार करायचा आहे. मात्र विश्वासच्या अकस्मात जाण्याने विदयाधरला त्याच्या मैत्रीसाठी गावात यावं लागतं, तो विश्वासचं स्वप्न पूर्ण करू शकतो का, त्याच्या मार्गात कोणत्या अडचणी येतात.. हे रेखाटणारा चित्रपट म्हणजे 'स्वप्न तुझे नी माझे'. मिलिंद गुणाजी,ओंकार कर्वे, नेहा जोशी, नितीन पारेगांवकर, अनिता विश्वासराव, मेधा गोखले या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. दिग्दर्शक अशोक कांबळी यांनीच चित्रपटाची पटकथा लिहिली असून संवादही त्यांचेच आहेत. कॅमेरामन राजा फडतरे यांनी चित्रपटाचं छायाचित्रण केलं असून अनिल सुतार यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. नवीन वर्षात हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होतो आहे.